(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हार्दिक पांड्या फूल पॅकेज, त्याचा फॉर्म विश्वचषकासाठी महत्वाचा - रोहित शर्मा
Team India ODI World Cup Squad 2023: विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Team India ODI World Cup Squad 2023: विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली. रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. हार्दिक पांड्या फूल पॅकेज आहे. विश्वचषकात त्याचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देतो. पाकिस्तानविरोधात हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी 87 धावांची खेळी केली होती. तर नेपाळविरोधात भेदक मारा केला. हार्दिक पांड्या फॉर्मात असणे भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरु शकते, याची कल्पना कर्णधार रोहित शर्मा याला आहे.
सर्वोत्कृष्ट संघ निवडलाय -
विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट संघाची निवड केली आहे. भारताची फलंदाजी मजबूत झाली आहे. फलंदाजी डेफ्थ आहे. त्याशिवाय आमच्याकडे स्पिन आणि वेगवान गोलंदाजीचे पुरसे पर्याय आहेत, असे रोहित म्हणाला. खेळाडूंचा फॉर्म आणि प्रतिस्पर्धी संघ पाहून प्लेईंग 11 ची निवड केली जाईल, असे रोहित म्हणाले.
India ODI World Cup Squad Live : विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूबद्दल काय म्हणाला रोहित
विश्वचषकासाठी निवड न झालेल्या खेळाडूंचे दुख समजू शकतो, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत दिली. रोहित म्हणाला की, मी स्वत: या परिस्थितीचा सामना केला आहे. 2011 विश्वचषकासाठी माझी निवड झाली नव्हती. संधी न मिळालेल्या खेळाडूंनी आपले मनोबल खचू न देता पुढील संधीची तयारी करावी, असा सल्ला रोहित शर्मा याने दिलाय.
India ODI World Cup Squad Live: केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
India ODI World Cup Squad Live: भारतीय संघाचे कॉम्बिनेशन
विश्वचषकाच्या 15 शिलेदांराची आज निवड करण्यात आली आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. 4 अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. पण संघात 27 सप्टेंबरपर्यंत बदल करण्याची परवानगी आयसीसीने दिली आहे.
विश्वचषकासाठी भारताचे 15 शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव