(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jasprit Bumrah : बुमराहच्या जागी वर्ल्ड कपमध्ये शमीला संधी द्या, माजी भारतीय खेळाडूची थेट मागणी
T20 World Cup 2022 : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखातपतग्रस्त झाल्यामुळे तो आगामी टी-20 विश्वचषक खेळू शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
Mohammed Shami Team India T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असता भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. अशामध्ये बुमराहच्या जागी विश्वचषकात मोहम्मद शमी (Mohammad shami) याला संधी मिळावी असं स्पष्ट मत माजी भारतीय क्रिकेटर सबा करीम (Saba Karim) यांनी म्हटलं आहे.
गुरुवारी (29 सप्टेंबर)समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील उर्वरीत सामन्यांसाठी बुमराहच्या जागी सिराजला संधी मिळाली आहे. शमी कोरोनाबाधित असल्यामुळे या दौऱ्याला मुकला असून आता त्याची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान शमीने मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकातील सामन्यांनंतर अद्याप आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामना खेळलेला नाही.
दरम्यान बुमराहच्या जागी शमीला संधी देण्याची मागणी करताना करीम म्हणाले, "बुमराह एक खास गोलंदाज आहे. टी20 क्रिकेटमध्ये अशा गोलंदाजांची गरज असते, जे सुरुवातीला विकेट्स घेऊन अखेरच्या डेथ ओव्हर्सही चांगल्याप्रकारे टाकू शकतात. बुमराहने अशीच कमाल मागील काही वर्षे केली असून त्याच्या बाहेर जाण्याने भारतीय संघाला मोठा झटका बसू शकतो. अशामध्ये माझ्या मते बुमराहच्या जागी शमी एक चांगला पर्याय असेल. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, त्याने कमाल केली आहे. तो सुरुवातीला विकेट्स घेऊन पॉवरप्लेमध्येही विकेट्स घेऊ शकतो."
आणखी पर्याय कोणते?
टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-