Father's Day: कुणी फळं विकली, कुणी रिक्षा चालवली तर कोण इलेक्ट्रिशियन! आज त्यांची मुलं गाजवतायेत क्रिकेटचं मैदान
Father's Day 2022: फादर्स डे (Father's Day) दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस 19 जून रोजी साजरा केला जातोय.
Father's Day 2022: फादर्स डे (Father's Day) दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस 19 जून रोजी साजरा केला जातोय. आजच्या दिवशी फादर्स डे'च्या दिवशी मुले त्यांच्या वडिलांची भूमिका समजून घेतात आणि त्यांचं कौतुक करतात. हेच वडील मुलांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मग ती भावनिक असो मानसिक असो की आर्थिक. या दिवशी मुलं वडिलांचे त्यांच्या स्वत: च्या कुटुंबासाठीचे आणि समाजासाठीचे योगदान कबूल करतात. दरम्यान, आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी अनेकांच्या वडिलांनी अहोरात्र मेहनत केलीय. आज त्यांचीच मुलं क्रिकेटचं मैदान गाजवतायेत. अशा खेळाडूंच्या वडिलांच्या संघर्षावर एक नजर टाकुयात.
कुलदीप सेन
राजस्थान रॉयल्ससाठी शेवटच्या षटकात 15 धावा वाचवणाऱ्या कुलदीपनं आयपीएल 2022 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मध्य प्रदेशसाठी चमत्कार केल्यानंतर आता कुलदीपनं आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. रेवाचा रहिवासी कुलदीपचा आयपीएलपर्यंतचा प्रवास खूप खडतर आहे. कुलदीपचे वडील सलून चालवतात. घरातील मोठा मुलगा कुलदीपने वयाच्या ८ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला महान फलंदाज बनायचे होते पण प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून तो वेगवान गोलंदाजी करू लागला. त्याच्या खेळाला बाधा येऊ नये म्हणून अकादमीने कुलदीपचं शुल्कही माफ करण्यात आले.
टिळक वर्मा
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी फ्रँचायझीचा युवा खेळाडू टिळक वर्मानं आपल्या कामगिरीने छाप पाडली. मेगा लिलावात 1.7 कोटींना विकलेल्या टिळकांसाठी आयपीएलचा प्रवास खूप कठीण होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील इलेक्ट्रीशियन होते आणि त्यांनी आपल्या मुलाच्या गरजा जमेल तितक्या पूर्ण केल्या. याशिवाय टिळक यांचे प्रशिक्षक सलाम बयाश यांनीही त्यांना खूप साथ दिली. लॉकडाऊनच्या काळात टिळकांच्या वडिलांचे काम थांबलं होतं. ज्यामुळं टिळकला क्रिकेटपासून दूर जावा लागलं होतं. परंतु, या संकटाच्या काळात प्रशिक्षकानं त्यांना साथ दिली आणि टिळक आयपीएलपर्यंत पोहोचला.
रिंकू सिंह
केकेआरच्या शेवटच्या सामन्यात संस्मरणीय तुफानी खेळी करणारा रिंकू सिंह दीर्घकाळापासून आयपीएलच्या खेळाचा भाग आहे. मात्र, या हंगामात त्याला खरी ओळख मिळाली. लखनौविरुद्धच्या सामन्यात तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी, त्यानं आपल्या जलद खेळीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रिंकूने आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. ताला नगरी अलीगढ येथील रहिवासी असलेल्या रिंकूचे वडील गॅस विक्रेते आहेत. पाच भावांपैकी एक असणाऱ्या रिंकूला क्रिकेटची आवड होती. त्यानं प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्यानं कोलकात्याच्या संघात स्थान मिळवले आणि आता तो आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला आहे.
उमरान मलिक
जम्मू एक्सप्रेस म्हणून ओळख मिळवलेल्या उमरान मलिकनं आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगानं सर्वांना प्रभावित केलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्यानं सातत्यानं 150 किमी प्रतितास हून अधिक वेगानं गोलंदाजी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील एका छोट्या गावातून आयपीएलपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. उमरानला इथपर्यंत नेण्यात त्यांचे वडील अब्दुल रशीद यांचं मोठं योगदान आहे. उमरान मलिकचे वडील अब्दुल रशीद हे शहीदी चौकात फळ विकतात.
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराजचे वडील रिक्षा चालवतात. सिराज क्रिकेट खेळण्यासाठी हैदराबादच्या उप्पल स्टेडियममध्ये जायचा. त्याला तिथे जाण्यासाठी सिराजचे वडील त्याला दररोज 60 रुपये द्यायचे. आरसीबी पॉडकास्टमध्ये सिराजनं सांगितलं की, जेव्हा मी सरावासाठी स्टेडियममध्ये जायचो तेव्हा माझ्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला. माझ्याकडे मोटारसायकल होती. बाबा मला पेट्रोलसाठी 60 रुपये द्यायचे. ते पैसे घेऊन मी उप्पल स्टेडियम गाठायचो, जे माझ्या घरापासून खूप दूर होतं. आयपीएलमुळं माझ्या कौटुंबिक समस्या संपल्या आहेत. वडिलांनी आता रिक्षा चालवणं बंद केलंय. तर, आईने घरकाम करणे बंद केलंय. एवढेच नव्हेतर आम्ही आता भाड्याच्या घरात राहत नाही.
हे देखील वाचा-
- IND vs SA, 5th T20 : भारत-दक्षिण आफ्रिका मालिका पावसाच्या हातात? हवामानाची स्थिती चिंता वाढवणारी
- T20 World Cup : 'इंग्लंड दौऱ्यापासून राहुल द्रविड मिशन वर्ल्डकपसाठी लागणार कामाला', सौरव गांगुलीने सांगितला 'मास्टरप्लान'
- Neeraj Chopra : नीरज चोप्राची अप्रतिम कामगिरी सुरुच; फिनलँडमध्ये Kuortane Games मध्ये मिळवलं सुवर्णपदक
(एबीपी माझाच्या वाचकांना 'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!)