स्टोक्सचे शतक, राशीद-मोईन अलीचा भेदक मारा, इंग्लंडचा नेदरलँड्सवर विजय
ENG vs NED Match Report: इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली.
ENG vs NED Match Report: इंग्लंडनं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसऱ्या विजयाची नोंद केली. इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. पुण्यातल्या या सामन्यात इंग्लंडनं नेदरलँड्सला विजयासाठी 50 षटकांत 340 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर नेदरलँड्सचा अख्खा डाव 179 धावांत गडगडला. इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशिदनं प्रत्येकी तीन, तर डेव्हिड विलीनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, बेन स्टोक्सचं शतक आणि ख्रिस वोक्सच्या अर्धशतकच्या जोरावर इंग्लंडनं 50 षटकांत नऊ बाद 339 धावांची मजल मारली होती. बेन स्टोक्सनं 84 चेंडूंत 108 धावांची आणि ख्रिस वोक्सनं 45 चेंडूंत 51 धावांची खेळी उभारली.
नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरू याने सर्वात मोठी खेळी केली. त्याने 34 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. त्याने या डावात दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याशिवाय स्कॉट एडवर्ड्स याने 42 चेंडूत 38 धावांची खेळी केली. सिब्रंड एंगलब्रंट याने 49 चेंडूत 33 धावा केल्या. नेदरलँड्सच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडाही पार करता आला नाही.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 339 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने शानदार शतक टोकले. 108 धावांच्या खेळीत स्टोक्सने सहा चौकार आणि सहा षटकार लगावले. डेविड मलान याने 74 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षठकार आणि 10 चौकार लगावले. त्याशिवाय ख्रिस वोक्स याने अखेरीस अर्धशतक ठोकले. त्याने आपल्या या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. नेदरलँड्सकडून बेस डी लीडे याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. आर्यन दत्त आणि वॉन वीक यांना प्रत्येकी दोन दोन विकेट मिळाल्या. वॉन मीकेरेन याने एक विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची गुणतालिकेत मोठी झेप -
नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव करत इंग्लंडने गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडला आठ सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. दोन विजयासह इंग्लंड संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांचे समान गुण आहेत. पण इंग्लंडचा नेट रनरेट चांगलाय. त्यामुळे ते सातव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश आठव्या, श्रीलंका नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानी आहे.
ENGLAND STILL IN CONTENTION FOR THE 2025 CHAMPIONS TROPHY...!!!! pic.twitter.com/XzRJzjRfUY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023