England host WTC Final News : आयसीसीने भारताला पुन्हा डावललं, 2031 पर्यंत WTC Final चं यजमानपद इंग्लंडकडेच, जय शाहांच्या निर्णयानं क्रिकेट वर्तुळात खळबळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

England host WTC Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चे सध्याचे चक्र सुरू आहे. यादरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या पुढील तीन आवृत्त्यांचे अंतिम सामने कोणत्या देशात खेळवले जातील याची घोषणा करण्यात आली आहे. सिंगापूरमधील आयसीसी बैठकीनंतर, आयसीसीने एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पुढील तीन आवृत्त्यांचे अंतिम सामने इंग्लंड देशात खेळवले जातील.
WTC अंतिम सामन्याबाबत ICC ची मोठी घोषणा
यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे ठिकाण इंग्लंडबाहेर हलवावे अशी सतत चर्चा सुरू होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केलं आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळवला जाणार आहे. सुरुवातीपासूनच WTC फायनलची जबाबदारी ECB कडे असून, आयसीसीने 2027, 2029 आणि 2031 मधील अंतिम सामन्यांसाठीही इंग्लंडलाच यजमान म्हणून कायम ठेवले आहे.
आयसीसीने सांगितले की, ECB ने मागील तीन WTC फायनलचे यशस्वी आयोजन केले आहे आणि इंग्लंडमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात स्पर्धा घेणं सोयीचं ठरतं, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंतचे WTC फायनल खालील तीन वेगवेगळ्या मैदानांवर खेळवले गेले आहेत.
- साउथॅम्प्टन (2021)
- द ओव्हल (2023)
- लॉर्ड्स (2025)
आयसीसीने भारताला पुन्हा डावललं
डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन करण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची नावे पुढे येत होती. पण, आयसीसीने या देशांचे स्वप्न भंग केले आणि स्पष्ट केले की इंग्लंड सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करत राहील. ही बातमी इंग्लिश क्रिकेट चाहत्यांसाठी खूप चांगली आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर, आता बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांना डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन करण्यासाठी 2031 पर्यंत वाट पहावी लागेल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019 मध्ये झाली सुरू...
कसोटी क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यासाठी 2019 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली. ही स्पर्धा टी-20 आणि ODI च्या जादुई वातावरणात कसोटी स्वरूपाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हे स्वरूप राखण्यासाठी एक प्रयत्न आहे. दर दोन वर्षांनी होणारा हा फायनल जगातील दोन सर्वोत्तम कसोटी संघांमध्ये आहे. आतापर्यंत, न्यूझीलंड (2021), ऑस्ट्रेलिया (2023) आणि दक्षिण आफ्रिका (2025) यांनी हे विजेतेपद जिंकले आहे.
हे ही वाचा -





















