(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ : रोमहर्षक स्थितीत वेलिंग्टन टेस्ट, फॉलोऑन मिळूनही न्यूझीलंडचं धमाकेदार कमबॅक, इंग्लंडसमोर 258 धावाचं टार्गेट
ENG vs NZ 2nd Test: वेलिंग्टन कसोटीमध्ये इंग्लंडने पहिल्या डावातील दमदार खेळाच्या आधारावर 226 धावांची विशाल आघाडी घेतली. पण फॉलोऑन मिळूनही किवी संघाने 483 धावा स्कोरबोर्डवर लावत जोरदार पुनरागमन केलं.
ENG vs NZ Test : वेलिंग्टन येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील कसोटी सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. एका रोमांचक वळणावर पोहोचलेल्या या सामन्यात इंग्लंड आपला दुसरा आणि सामन्यातील अखेरचा डाव खेळत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून 258 धावाचं टार्गेट चेस करणाऱ्या इंग्लंडने दिवसाअखेर 48 धावा करत एक विकेट गमावली आहे. 210 धावांच्या पिछाडीवर इंग्लंडचा संघ असून पाचव्या दिवशी या खेळाचा नेमका निकाल समोर येणार आहे.
Day four finishes with the second Test nicely poised in Wellington.
— ICC (@ICC) February 27, 2023
Watch #NZvENG live on https://t.co/MHHfZPyHf9 with a Black Caps Pass 📺 pic.twitter.com/tPzQgPmB8Y
या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात जिथे इंग्लंडचा संघ एकतर्फी वर्चस्व गाजवत होता, तिथे किवी संघाने पुढील दोन दिवस वर्चस्व गाजवलं. एकीकडे पहिल्या डावात 435 धावा करुन इंग्लंडने किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची विशाल आघाडी घेतली. पण न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य दिलं. आतापर्यंत झालेल्या सामन्याचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजी निवडली. पण इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी करत आपला पहिला डाव 8 गडी गमावून 435 धावांवर घोषित केला. यावेळी हॅरी ब्रूकने 183 तर जो रुटने नाबाद 156 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 138 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. किवी संघ 297 धावांनी पिछाडीवर होता. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांनी आपल्या संघाला 209 धावांपर्यंत नेलं. ज्यानंतर पहिल्या डावात 226 धावांनी पिछाडीवर पडल्यामुळे इंग्लंडने किवी संघाला फॉलोऑन दिला.
फॉलोऑन मिळूनही दिलं 258 धावांचं लक्ष्य
फॉलोऑन खेळताना किवी फलंदाजांनी चांगली झुंज देत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गडी गमावून 202 धावा केल्या. यानंतर आज (27 फेब्रुवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशी किवी फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. केन विल्यमसन (132 धावा), टॉम ब्लंडेल (90 धावा), डॅरिल मिशेल (54 धावा) यांच्या खेळीमुळे किवी संघाने दुसऱ्या डावात 483 धावा केल्या. यावेळी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचने 5 बळी घेतले. अशाप्रकारे इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य मिळाले.
इंग्लंडने पहिली विकेटही गमावली
258 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिली विकेटही गमावली. एकूण 39 धावांवर जॅक क्रॉलीच्या (24 धावा) रुपाने पहिली इंग्लिश विकेट पडली. खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने एक विकेट गमावून 48 धावा केल्या होत्या. म्हणजेच पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 210 धावा कराव्या लागतील, त्यांच्या हातात 9 विकेट्स शिल्लक आहेत.
हे देखील वाचा-