VIDEO : आरसीबी चाहत्यांची किंग कोहलीसाठी बॅटिंग; कॅप्टन रोहित शर्माकडे केली मोठी मागणी!
IND vs NED Viral Video : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषकातील अखेरचा सामना सुरु आहे.
IND vs NED Viral Video : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषकातील अखेरचा सामना सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्स संघाची सुरुवात ठिकठाक झाली. भारताच्या गोलंदाजीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लाईव्ह सामन्यात चाहत्यांनी विराट कोहलीला गोलंदाजी देण्यासाठी रोहित शर्माकडे मागणी केली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल -
विराट कोहली मागील 15 वर्षांपासून आरसीबीसाठी खेलतोय. बंगळुरुचे चिन्नास्वामी स्टेडियम आरसीबीचे होम ग्राऊंड आहे. येथे विराट कोहलीचे शेकडो चाहते आहेत. आजच्या सामन्यातही विराटच्या चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे विराटला गोलंदाजी देण्याची मागणी केली. स्टेडियममधील चाहते विराटला गोलंदाजी देण्यासाठी जोर जोरात ओरडत असल्याचे व्हिडीओत दिसत होते. दरम्यान, पुण्यात विराट कोहलीने गोलंदाजी केली होती. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर विराट कोहलीने षटक पुर्ण केले होते. त्यावेळी चाहत्यांचा आनंद द्विगणित झाला होता. आज दुबळ्या नेदरलँड्सविरोधात विराट कोहली गोलंदाजी करतो.. हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ -
Crowd asking Rohit Sharma to give the ball to Virat Kohli....!!!!pic.twitter.com/6FYtHhPR0v
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
विराटचे अर्धशतक -
गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या खास शैलीत फलंदाजी केली. विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराटने मोर्चा सांभाळला. विराट कोहलीने 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 चेंडूत 71 धावांची भागिदारी केली. विराट कोहली याने झटपट धावा काढत धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने विश्वचषकातील पाचवे अर्धशतक ठोकले. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरलाय.
भारताचा 410 धावांचा डोंगर -
भारतीय फलंदाजांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज फटक्यांची जणू दिवाळी साजरी केली. त्यामुळंच नेदरलँड्सविरुद्धच्या अखेरच्या विश्वचषक साखळी सामन्यात भारताला चार बाद 410 धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं झंझावाती शतकं साजरी केली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांसह 102 धावांची खेळी केली. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला आणि धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी या सामन्यात अर्धशतकं झळाकवली. रोहित शर्मानं 61, शुभमन गिलनं 51 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली.