तब्बल 23 वर्षे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवून मितालीचा क्रिकेटला अलविदा; तिचे काही रेकॉर्ड तोडणं म्हणजे अगदी अशक्य
भारतीय क्रिकेट इतिहासातील आघाडीची महिला क्रिकेटपटू मिताली राजने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, दोन दशकांहून अधिक काळ मैदान गाजवल्यानंतर तिने हा निर्णय घेतला आहे.
Mithali Raj Retirement : क्रिकेट जगताला भारताने अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यातील एक म्हणजे भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj). भारतीय महिला संघासाठी (Team India) 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स नावे केले आहेत. तिचे काही रेकॉर्ड आजवर कोणी तोडू शकलेलं नाही, तसंच तोडणंही अशक्य असल्याचं म्हटलं जातं. अशा काही खास रेकॉर्ड्सवर नजर टाकूया...
मिताली राजचे प्रमुख रेकॉर्ड्स
- मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.
- 2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
- मितालीने एकाच संघासाठी सर्वाधीक वनडे सामने खेळले असून या सामन्यांची संख्या 109 आहे.
- मिताली विश्वचषक स्पर्धेत 1,000 हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
- मितालीने वनडे सामन्यात सर्वाधिक रन केले असून 232 सामन्यात तिने 7 हजार 805 रन केले आहेत.
- मिताली आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
- मिताली 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
- 200 वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेट मितालीच आहे.
- सहा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे.
- टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.
कर्णधार म्हणून मितालीची कामगिरी
मिताली राज (भारत) : एकूण सामने 155, विजय 89, पराभव 63
सी. एडवर्ड्स (इंग्लंड) : एकूण सामने 117, विजय 72, पराभव 38
बी. क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : एकूण सामने 101, विजय 83, परभव 17
निवृत्ती घेताना काय म्हणाली मिताली?
टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज 39 वर्षीय मिताली राजनं आज म्हणजेच, 8 जून 2022 रोजी ट्विटरवरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. एक पत्र तिनं ट्वीट करत शेअर केलं आहे. मितालीनं तिच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केलं, तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली 23 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.
हे देखील वाचा-