Mithali Raj Retirement : टीम इंडियाची विक्रमवीर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Mithali Raj Retirement : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज निवृत्त. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीचा निर्णय.
![Mithali Raj Retirement : टीम इंडियाची विक्रमवीर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती Mithali Raj Announced Her Retirement from All Forms of International Cricket Mithali Raj Retirement : टीम इंडियाची विक्रमवीर मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/10/88d9ae1fa11e4dd6f9e05487c996605f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mithali Raj Retirement : भारतीय महिला संघाची (Team India) कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीनं बुधवारी दुपारी याची घोषणा केली आहे. यासह मितालीने तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मितालीनं आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय या स्टार खेळाडूनं कसोटी, एकदिवसीय, टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. पण लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरंच राहिलं.
टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज 39 वर्षीय मिताली राजनं आज म्हणजेच, 8 जून 2022 रोजी ट्विटरवरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. एक पत्र तिनं ट्वीट करत शेअर केलं आहे. मितालीनं तिच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केलं, तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता. गेली 23 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.
मिताली राजच्या निवृत्तीबद्दल माहिती देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह म्हणाले की, "अद्भुत कारकिर्दीचा शेवट! धन्यवाद. मिताली राज भारतीय क्रिकेटमधील तुमच्या अतुलनीय योगदानाबद्दल धन्यवाद. मैदानावरील तुमच्या नेतृत्वामुळे भारतीय महिला संघाला मोलाची मदत झाली. मैदानावरील एका अप्रतिम खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!"
26 जून 1999 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजनं मार्च 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान तिनं 12 कसोटी सामने, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 12 कसोटी सामन्यांमध्ये तिनं 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 699 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये तिनं 7 शतकं आणि 64 अर्धशतकांसह 7805 धावा केल्या. त्याचवेळी तिनं 17 अर्धशतकांच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये 2364 धावा केल्या आहेत.
कर्णधार म्हणून मितालीचे रेकॉर्ड्स :
मिताली राज (भारत) : एकूण सामने 155, विजय 89, पराभव 63
सी. एडवर्ड्स (इंग्लंड) : एकूण सामने 117, विजय 72, पराभव 38
बी. क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : एकूण सामने 101, विजय 83, परभव 17
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)