BCCI Central Contract : रहाणे, पुजारा अन् भुवी-धवन यांच्यासाठी टीम इंडियाची दारं बंद?
BCCI Central Contract : स्वतःहून बीसीसीआयची नाराजी ओढावून घेतलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)आणि ईशान किशनचा (Ishan Kishan) पत्ता बीसीसीआयनं कापलाच, पण त्याशिवाय आणखी काही दिग्गजांनाही करारातून वगळलेय
BCCI Central Contract : बीसीसीआयनं केंद्रीय करारातून अनेक खेळाडूंना वगळलं. स्वतःहून बीसीसीआयची (BCCI) नाराजी ओढावून घेतलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)आणि ईशान किशनचा (Ishan Kishan) पत्ता बीसीसीआयनं कापलाच, पण त्याशिवाय आणखी काही दिग्गजांनाही करारातून वगळलेय. यामध्ये कसोटी स्टार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंसाठी टीम इंडियाचं दारं बंद झालेय का?
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसाठी दारं बंद -
राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारानं ती जागा भरली होती. पुजाराला भारतीय संघाची वॉल म्हटलं जायचं. पण आता पुजाराला बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकलेय. पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये धावांचा डोंगर उभा केला आहे. मागील पाच डावांमध्ये पुजाराने 2 शतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर याआधी त्याने नाबाद द्विशतकही ठोकले होते. असे असूनही गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर तो परतला नाही. त्याचं टीम इंडियातील स्थान आता जवळपास संपल्यात जमा आहे.
भारतीय संघाचं कर्णधारपद संभाळलं, ऑस्ट्रेलियात अशक्यप्राय ऐतिहासिक विजय मिळवून दिला... त्या अजिंक्य रहाणे याला केंद्रीय करारातून वगळलं. गतवर्षीय आयपीएलमध्ये स्फोटक कामगिरीनंतर त्याला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये संधी दिली, पण त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याचा पत्ता कट झाला. तेव्हापासून त्याचं कमबॅक झालेले नाही. बीसीसीआय रहाणे आणि पुजाराच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यामुळे या दोघांसाठी टीम इंडियाची दारं बंद झाली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको.
धवन-भुवीसाठीही रस्ता बंद -
बीसीसीआयने स्टार सलामीवीर शिखर धवनलाही केंद्रीय करारातून वगळले आहे. गेल्यावर्षी बीसीसीआयने धवनकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते. आता त्याचे टीम इंडियात पुनरागमन अवघड वाटत आहे. शिखरला आशिया चषक आणि विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमधूनही बाहेर ठेवण्यात आले होते, त्यामुळे बीसीसीआयवर जोरदार टीका झाली होती. पण बोर्ड त्याच्यापुढे विचार करत आहे. धवनशिवाय भुवनेश्वर कुमार यालाही बीसीसीआयनं झटका दिलाय. भुवनेश्वर कुमार यालाही करारातून वगळलेय. त्याचं कमबॅक आता नाहीच्या बरोबरीत आहे.
उमेश यादव -
विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव याचेही टीम इंडियातील परतीचे दरवाजे आता जवळपास बंद झाले आहेत. गेल्या वर्षी उमेश यादवला वार्षिक करारावर ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी उमेश यादव याला केंद्रीय करारातून वगळण्यात आलेय. याचे टीम इंडियात पुनरागमन अतिशय कठीण आहे.