(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हकालपट्टीआधी देशप्रेम जागं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणत बाबर आझमने कर्णधारपद सोडलं
Babar Azam: विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ माजली होती. गोलंदाजी कोचनंतर आता बाबर आझम यानेही राजीनामा दिलाय. ह
Babar Azam: विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ माजली होती. गोलंदाजी कोचनंतर आता बाबर आझम यानेही राजीनामा दिलाय. हकालपट्टी करण्याआधी बाबर आझम याने कर्णधारपदाला रामराम ठोकलाय. विश्वचषकात फलंदाजी आणि नेतृत्वात सपशेल अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बाबर आझम याच्या नेतृत्वावर निर्णय घेण्यात येणार होता. आज बाबर आझम याने पीसीबी चेअरमनची भेट घेतली. त्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत नेतृत्व सोडल्याचे त्याने सांगितले. त्याशिवाय नेतृत्वात काय काय केले.. त्याचा पाढाही वाचला.
भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने सुमार कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. पाकिस्तान संघाने आठ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानले. नऊ साखळी सामन्यात पाकिस्तानला फक्त चार विजय मिळवता आले. कर्णधार बाबर आझम याला स्पर्धेत एकही मोठी खेळी करता आली नाही. त्याच्याकडून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती, पण चाहत्याचा भंग झाला. नेतृत्वातही बाबर कमाल करु शकला नाही. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरले. संघाचे माजी दिग्गज खेळाडू रमीझ राजा सुद्धा चांगलेच संतापले. बाबर आझम याने आज कर्णधारपदाला रामराम ठोकला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
बाबर काय म्हणाला ?
2019 मध्ये मला पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मिळाले. मागील चार वर्षांत मैदानावर आणि मैदानाबाहेर मी अनेक चढउतार पाहिले. पाकिस्तानचा सन्मान आणि आदर क्रिकेटविश्वात काय ठेवण्याचं ध्येय ठेवले. मर्यादित षटकात पाकिस्तान संघाला नंबर 1 पर्यंत पोहचवले. त्यासाठी प्रशिक्षक, सहकारी यांच्यासह सर्व चाहत्यांचा मोलाचा वाटा राहिला. माझ्या प्रवासात चाहत्यांच्या पाठिंबाही महत्वाचा आहे.
आज मी तिन्ही प्रकारचं कर्णधारपद सोडत आहे. माझ्यासाठी हे कठीण आहे, पण यावेळी हा निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानसाठी खेळणं सुरुच ठेवणार आहे. नवीन कर्णधाराला माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. आतापर्यंत सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि चाहत्यांचे खूप सारे आभार...
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023
बाबरची विश्वचषकातील कामगिरी -
2023 विश्वचषकात पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मोठी कामगिरी करता आली नाही. बाबर आझम याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही. बाबर आझम याने विश्वचषकात चार अर्धशतके ठोकली. पण त्यामधील तीन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला. बाबरच्या फक्त एका अर्धशतकामुळे पाकिस्तानचा विजय झालाय. विश्वचषकातील नऊ साखळी सामन्यात बाबर आझम याने चार अर्धशतकाच्या मदतीने 320 धावा केल्या. त्यामध्ये 74 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होय. साखळी सामन्यातील नेदरलँड्सविरोधात बाबरला फक्त पाच धावा करता आल्या. श्रीलंकेविरोधात 10, भारताविरोधात 50, ऑस्ट्रेलियाविरोधात 18, अफगाणिस्तानविरोधात 74, दक्षिण आफ्रिकाविरोधात 50, बांगलादेशविरोधात 09, न्यूझीलंडविरोधात नाबाद 66 आणि इंग्लंडविरोधात 38 धावांची खेळी केली.