Babar Azam On Virat Kohli: विराट कोहलीसोबतच्या तुलनेवर पाकिस्तानचा बाबर आझम स्पष्टच बोलला; चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
Babar Azam On Virat Kohli: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाबर आझमला वगळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एकच खळबळ उडाली आहे.
Babar Azam On Virat Kohli: पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू बाबर आझमला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी संघातून वगळल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये फखार जमाने याबाबत ट्विट केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये आणखी वादाची ठिणगी पडली आहे.
फखार जमानने बाबर आझमची (Babar Azam) तुलना विराट कोहलीशी (Virat Kohli) केली होती, मात्र आता बाबर आझमने स्वत: विराट कोहलीशी केलेल्या तुलनेवर मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहली इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, असं बाबर आझमने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
मला अजून खूप काही साध्य करायचे आहे- बाबर आझम
एका मीडिया मुलाखतीत बाबर आझमला विचारण्यात आले की त्याला नेहमी विराट कोहलीबद्दल प्रश्न का विचारले जातात आणि त्याची तुलना विराटशी का केली जाते? यावर बाबरने हसत हसत उत्तर दिले, "आमची तुलना करत राहणे हे लोकांचे काम झाले आहे. माझ्या मते विराट कोहली हा इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, तर मीही त्याच्या खूप मागे आहे आणि मला अजून खूप काही साध्य करायचे आहे, असं बाबर आझम म्हणाला. बाबर आझमच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे.
2022 मध्ये शेवटचे कसोटी शतक-
बाबर आझम आणि विराट कोहली हे दोघेही 2024 मध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. एका बाजूला बाबर आझम आहे, ज्याला गेल्या 18 कसोटी डावांमध्ये 50 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्याचे शेवटचे कसोटी शतक डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाले होते. या वाईट काळात त्याने पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. दुसरीकडे, 2024 हे वर्ष विराट कोहलीसाठीही फारसे चांगले राहिले नाही. त्याचे कसोटी सामन्यातील शेवटचे शतक डिसेंबर 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते. त्यानंतर कोहलीने 7 कसोटी डाव खेळले असून त्यात त्याला केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. 2024 मध्ये कोहलीने कसोटी सामन्यात केवळ 157 धावा केल्या आहेत. बाबर आणि कोहली दोघेही सध्या आपापल्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहेत.
पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडचा पहिला सामना कसा राहिला?
इंग्लंडने पाकिस्तानचा पाचव्या आणि अखेरच्या दिवशी एक डाव व 47 धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 बाद 823 धावांवर डाव घोषित केला. 267 धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव 220 धावांवर गडगडला. त्यामुळे पहिल्या डावात 500 च्यावर धावा उभारून देखील डावाच्या फरकाने पराभवाची नामुष्की झेलावी लागलेला पाकिस्तान पहिलाच संघ ठरला आहे.