WTC फायनलचा मार्ग भारतासाठी सोपा; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत!
Border-Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
IND vs AUS Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) ही 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना 03 जानेवारी 2025 पासून खेळवला जाईल. मात्र याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. तसेच कॅमेरॉन ग्रीनच्या दुखपतीबाबत तो ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर अधिक माहिती समोर येईल, असं ईएसपीएन क्रिकइन्फोने सांगितले.
कॅमेरॉन ग्रीन कसोटी संघातील एक महत्वाचा खेळाडू-
पाठीच्या दुखापतीमुळे कॅमेरॉन ग्रीनचे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत (Border-Gavaskar Trophy 2024-25) खेळणे धोक्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी कॅमेरॉन ग्रीन कसोटी संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकुण पाच कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यात ग्रीनला दुखापत झाली. या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने 42 धावा करत 2 विकेट्स पटकावल्या होत्या.
भारतीय संघाला होणार फायदा-
कॅमेरून ग्रीन तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असून तो आता ऑस्ट्रेलियन संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. कॅमेरॉन ग्रीनने आतापर्यंत 28 कसोटी सामन्यांमध्ये 1,377 धावा आणि 35 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 11 डावांत 36.55 च्या सरासरीने 402 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकही आहे. भारताविरुद्ध कॅमेरॉन ग्रीनने आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या आहेत. आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या स्पर्धेतून ग्रीन बाहेर पडल्यास याचा भारतीय संघाला फायदा होईल. कारण WTC च्या फायनलसाठी ही मालिका जिंकणं भारतासाठी महत्वाचे असणार आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिली कसोटी- 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी- 06 ते 10 डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी - 26ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी-03 ते 07 जानेवारी,सिडनी
रिकी पाँटिंगची भविष्यवाणी-
ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताविरुद्ध 3-1 नं जिंकू शकतो, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी महान खेळाडू रिकी पाँटिंगने केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी सामने जिंकेल, भारत एका कसोटीत विजयी होईल तर एक कसोटी अनिर्णित राहील, असं पाँटिंग म्हणाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत यावेळी पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. तर अखेरची कसोटी 3 जानेवारी ते 7 जानेवारीला होणार होणार आहे. यामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट कसोटी देखील होणार आहे.
संबंधित बातमी:
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याच्या तयारीत; कोणत्या संघासोबत सुरु आहे चर्चा?