(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asian Games 2023 : यशस्वीने पहिल्याच सामन्यात केली ऐतिहासिक कामगिरी; शतकासह केले तीन मोठे विक्रम
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
Asian Games 2023 India vs Nepal Live Score : आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायस्वाल याने वादळी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जयस्वाल याने सात षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 48 चेंडूत शतक ठोकले. संथ खेळपट्टीवर यशस्वी जयस्वाल याने नवीन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. यशस्वीसमोर नेपाळची गोलंदाजी दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. यशस्वीने ऋतुराजसोबत पॉवर प्लेमध्ये 10 च्या सरासरीने धावा ठोकल्या. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर पुढच्या 26 चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले. यशस्वीच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. या शतकी खेळीसह यशस्वी जयस्वाल याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला भारतीय -
नेपाळविरोधात वादळी शतक ठोकत यशस्वी जायस्वाल याने मोठा विक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक ठोकणारा यशस्वी जायस्वाल पहिला भारतीय फंलदाज ठरला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. पहिल्याच सामन्यात यशस्वी जायस्वाल याने वादळी फलंदाजी केली.
टी20 शतक ठोकणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज -
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारताकडून सर्वात कमी वयामध्ये शतक ठोकण्याचा विक्रम यशस्वी जायस्वाल याने केला आहे. यशस्वी जयस्वालने सध्या 21 वर्ष 9 महिने आणि 13 दिवसाचा असताना शतक ठोकले आहे. याआधी हा विक्रम शुभमन गिल याच्या नावावर होता. शुभमन गिल याने 23 वर्ष 146 दिवसाचा असताना शतक ठोकले होते.
भारताकडून शतक ठोकणारा आठवा फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शतक ठोकणारा यशस्वी जायस्वाल आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे. यशस्वी जायस्वालच्या आधी शुभमन गिल, सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी शतके ठोकली आहेत.
The first centurion in Asian Games and smashed his maiden T20i century - Yashasvi Jaiswal.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 3, 2023
The sensation of Indian batting! pic.twitter.com/cAQSY6HMzb
भारताचा 202 धावांचा डोंगर
यशस्वी जायस्वालचे वादळी शतक आणि रिंकू-दुबेच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. तर अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली.