(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Dravid Request To Virat Kohli: मावळत्या प्रशिक्षकाने विराट कोहलीला दिलं पुढचं 'मिशन'; राहुल द्रविड नेमकं काय म्हणाले?
Rahul Dravid Request To Virat Kohli: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी जाताजाता विराट कोहलीला पुढचं मिशन दिलं आहे.
Rahul Dravid Request To Virat Kohli: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. टी-20 मधील दुसरा विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.
2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक पटकावला होता. बीसीसीआयने भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआय 125 कोटी रुपये देणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी जाताजाता विराट कोहलीला पुढचं मिशन दिलं आहे. राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला सांगितले की, तु सफेद चेंडूतील सर्व बॉक्ट टिक केले आहेत. आता लाल चेंडूतील बॉक्स टिक करायचं बाकी आहे. कोहलीने 2011 मधील एकदिवसीय विश्वचषक, 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 मधील टी-20 विश्वचषक यासह सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता किंग कोहलीला फक्त रेड बॉल ट्रॉफी म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची आहे.
"All three white ticked off, one red to go...tick it " pic.twitter.com/0MLAcGgYyo
— Gaurav (@Melbourne__82) June 30, 2024
टीम इंडियाने दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. टीम इंडिया दोन्ही वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 2021 मध्ये पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला होता, जिथे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आता टीम इंडिया 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विराट, रोहित आणि जडेजाने घेतली निवृत्ती-
2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सर्वात आधी कोहलीने सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.