बाबर आझमने अचानक कर्णधारपद सोडले; आता तीन खेळाडूंनी ठोकला शड्डू, कोणाच्या नावाची चर्चा?
Babar Azam: बाबर आझमच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली.
Babar Azam Pakistan: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) समोर नवीन कर्णधार निवडण्याचे आव्हान आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर पीसीबीने आता कर्णधारपदाचा अनुभव असलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये मोहम्मद रिझवान, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे.
कोण होणार नवा कर्णधार?
बाबर आझमच्या (Babar Azam) जागी कोणाला कर्णधार बनवणार?, हा पीसीबीसमोरचा मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानला आगामी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार असून, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदही पाकिस्तानकडे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघाच्या नवीन कर्णधाराची निवड करणे गरजेचे झाले आहे.
1. मोहम्मद रिझवान-
मोहम्मद रिझवानला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये मुलतान सुलतान संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय पांढऱ्या चेंडू क्रिकेटमध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत. बाबर आझमच्या जागी पीसीबी त्याचा विचार करते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रिझवानची क्षमता लक्षात घेता त्याच्या नावाचा विचार करता येईल.
2. शादाब खान-
शादाब खानने वयाच्या 22 व्या वर्षी पाकिस्तानचे कर्णधारपद स्वीकारले आणि तो देशाचा सर्वात तरुण कर्णधार बनला. त्याची अलीकडची कामगिरी पाहता तो बाबर आझमचा एक मजबूत पर्याय बनला आहे. तो पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडचे कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपदही पटकावले आहे. अलीकडेच, त्याने देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा चॅम्पियन्स एकदिवसीय चषक स्पर्धेतही आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
3. शाहीन शाह आफ्रिदी-
शाहीन शाह आफ्रिदीने पाच टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी त्याने फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 4 सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला. शाहीन शाह अफ्रिदीला कर्णधारपदी असताना जास्त संधी मिळाली नाही. शाहीनने पीएसएलमध्येही दोन विजेतेपद पटकावले असून अलीकडेच त्याला टी-20च्या कर्णधारपदावरून अचानक काढून टाकण्यात आले. त्यामुळे बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर पीसीबी शाहीन अफ्रिदीला आणखी एक संधी देण्याचा विचार करू शकते.
बाबर आझमचा कर्णधारपदाचा विक्रम
2019 ते 2024 दरम्यान, बाबर आझमने 20 कसोटी, 43 एकदिवसीय आणि 85 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. 2022 च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पोहचवण्यात मोठा वाटा होता. मात्र अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला.