Abhimanyu Easwaran Father : 'करुण नायरवर विश्वास, माझ्या मुलावर नाही...' अभिमन्यु ईश्वरनसाठी वडिलांचा संताप, गौतम गंभीरच्या टीम मॅनेजमेंटवर काढला राग
Abhimanyu Easwaran Father on BCCI : घरेलू क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नाही.

Abhimanyu Easwaran Father Statement : घरेलू क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत त्याला 961 दिवस उलटून गेले आहेत. याआधी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही तो सर्व सामने बाकावरच बसून राहिला होता. आपल्या मुलाची अशी उपेक्षा होत असल्याचे पाहून अभिमन्यूच्या वडिलांचा संयम अखेर तुटला आहे. त्यांनी थेट बीसीसीआयलाच काही कठोर प्रश्न विचारले आहेत.
ओव्हल कसोटीत भारताने चार बदल करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. करुण नायर, आकाशदीप, ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले. मात्र, अभिमन्यू ईश्वरनला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागली.
"मी दिवस नाही, आता वर्षं मोजतोय" – अभिमन्यू ईश्वरनचे वडील रघुनाथन ईश्वरन
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ईश्वरनचे वडील रघुनाथन म्हणाले की, “मी आता हे मोजतच नाही की अभिमन्यू किती दिवसांपासून डेब्यूच्या प्रतीक्षेत आहे. मी आता वर्षं मोजतोय. तीन वर्षांपासून तो या क्षणाची वाट बघतोय. एका खेळाडूचे काम म्हणजे धावा करणं आणि त्याने ते काम प्रामाणिकपणे केलं आहे. लोक म्हणतात की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इंडिया-ए संघात त्याचे प्रदर्शन खास नव्हते, म्हणून त्याला वगळण्यात आलं मान्य आहे. पण जेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली, तेव्हा करुण नायर टीममध्ये नव्हता. करुणला दलीप ट्रॉफी किंवा इराणी ट्रॉफीमध्येही संधी मिळालेली नव्हती.”
"अभिमन्यूने 864 धावा केल्या आहेत, मग तरीसुद्धा...”
ते पुढे म्हणाले, “जर गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहिली, तर अभिमन्यूने जवळपास 864 धावा केल्या आहेत. मग त्याची तुलना कशी करता येईल? करुण नायरला संधी मिळाली हे ठीक आहे, कारण त्यानेही घरगुती क्रिकेटमध्ये 800 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सिलेक्टर्सनी त्याच्यावर विश्वास दाखवला.”
"माझा मुलगा थोडासा डिप्रेस झाला आहे..."
रघुनाथन ईश्वरन यांनी सांगितले की, अभिमन्यू नैराश्यात आहे, जे साहजिकच आहे. त्यांच्या मते, “माझा मुलगा थोडासा डिप्रेस झाला आहे, आणि ते स्वाभाविक आहे. काही खेळाडू फक्त आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन करून लगेच टेस्ट टीममध्ये पोहोचतात. पण कसोटी संघाच्या निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीला निकष मानू नये. रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी यांवर कसोटी संघाचे दरवाजे उघडले जावेत.”
यापूर्वी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनीही ईश्वरनच्या सततच्या दुर्लक्षिततेवर आश्चर्य व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, “ईश्वरनला संधी का दिली जात नाही, हे समजत नाही. त्याचं अशा प्रकारे दुर्लक्षित होणं खरंच धक्कादायक आहे.”
हे ही वाचा -




















