37th National Games 2023 : महाराष्ट्राची पदकभरारी कायम! स्क्वे मार्शल आर्ट्मध्ये आज 8 पदकांची लयलूट
37th National Games 2023 : स्क्वे मार्शल आर्ट्, खो-खो, याटिंग, रोड सायकलिंग क्रीडा प्रकारांतील शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बुधवारी १४व्या दिवशीही आपली पदकभरारी कायम राखली.
पणजी : स्क्वे मार्शल आर्ट्, खो-खो, याटिंग, रोड सायकलिंग क्रीडा प्रकारांतील शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बुधवारी १४व्या दिवशीही आपली पदकभरारी कायम राखली. पदकतालिकेतील अग्रस्थानावर हक्क प्रस्थापित करणाऱ्या महाराष्ट्राने ७५ सुवर्ण, ६७ रौप्य, ७७ कांस्य अशी एकूण २१९ पदके कमावली आहेत. त्यामुळे गुरुवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र सव्वादोनशेचा टप्पाही ओलांडण्याची अपेक्षा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातून केली जात आहे. सेनादल (६४ सुवर्ण, २६ रौप्य, ३३ कांस्य, एकूण १२३ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (५७ सुवर्ण, ५० रौप्य, ६७ कांस्य, एकूण १७४ पदके) तिसऱ्या स्थानावर आहे. स्क्वे मार्शल आर्ट् क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने २ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ८ पदकांची लयलूट केली. योगिता खाडे आणि शिवराज वरघाडे यांनी सुवर्णपदकांना गवसणी घातली. खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साकारली. याटिंग स्पर्धेमध्ये वेदप्रकाश पाठकने रौप्यपदक जिंकले, तर सिखानसू सिंगने कांस्यपदकावर नाव कोरले. रोड सायकलिंगमधील ४१ किलोमीटर वैयक्तिक् टाइम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या चिन्मय केवलरामानीने कांस्यपदक पटकावले.
महाराष्ट्राचे पदकतालिकेतील अग्रस्थान अभिमानास्पद! -क्रीडामंत्री संजय बनसोडे
महाराष्ट्र गोव्यात चालू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे, हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राने दोनशे पदकांचा ऐतिहासिक टप्पाही ओलांडला आहे. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रीडापटू, प्रशिक्षक, सहाय्यक मार्गदर्शक यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. ‘’राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. आज १४व्या दिवशी महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी दोनशेहून अधिक पदके जिंकली आहेत. राज्याचा क्रीडामंत्री म्हणून मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आणि सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी खेळांसाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी या यशाबाबत चर्चा केली. त्यांनी राज्याचा क्रीडामंत्री म्हणून क्रीडापटूंचे अभिनंदन करण्यासाठी गोव्याला जाण्याची मला सूचना केली. गुरुवारी होणाऱ्या समारोप सोहळ्याला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धानकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेसुद्धा हजर राहणार आहेत,’’ असे बनसोडे यांनी सांगितले.
स्क्वे मार्शल आर्ट्स - आठ पदकांची लयलूट
महाराष्ट्राने स्क्वे मार्शल आर्ट् क्रीडा प्रकारात बुधवारी २ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ८ पदकांची लयलूट केली. योगिता खाडे आणि शिवराज वरघाडे यांनी सुवर्णपदकांना गवसणी घातली. महिलांच्या ७० किलो वजनी गटात योगिताने बाजी मारली. या गटात गोव्याच्या मिताली तामसेने रौप्य तसेच सरला कुमारी (राजस्थान) आणि निकिता कौर (दिल्ली) कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात शिवराज अव्वल ठरला. या गटात गोव्याच्या मंजू मालगावीने रौप्यपदक, तर अभिषेक गंभीर (दिल्ली) आणि हर्षवर्धन एलएस (कर्नाटक) यांना कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या आस्था गायकीने ४६ किलो वजनी गटात आणि आणि वैशाली बांगरने ७० किलोंवरील वजनी गटात रौप्य पदके पटकावली. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हुजैफा ठाकूर (५४ किलो), वेदांत सुर्वे (६२ किलो) आणि अश्विनी वागज् (६६ किलो) यांनी कांस्यपदके मिळवली. मिश्र एरो स्क्वे गटात महाराष्ट्राने कांस्यपदक मिळवले. या संघात मेहबूब अन्सारी, अमन खान आणि सानिया चव्हाण यांचा समावेश होता.
खो-खो -हाराष्ट्राची दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक!
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साकारली.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोठे विजय साजरे करत सुवर्णपदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते. यापूर्वी केरळ येथे झालेल्या २०१५च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या २०२२च्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्णपदक मिळवले होते व आता गोवा येथे हॅटट्रिक साजरी केली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा ७२-२६ (मध्यंतर ३६-१२) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चग्स्व राखले होते. सुयश गरगटेने २ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवले, फैझांखा पठाणने २ मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले, वृषभ वाघने २ मि. संरक्षण केले. तर कर्णधाराची खेळी करताना रामजी कश्यपने १ मि. संरक्षण करून तब्बल १२ गुण वसूल केले. तर आदित्य गणपुलेने १:५० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले व मोठ विजय निश्चित केला. तर पराभूत ओडिशाच्या विशाल ओरामने १.३० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर अर्जुन सिंघने १ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवत दिलेली लढत अपुरी ठरली.
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर ४६-४० असा दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने २.१०, १.३० मि. संरक्षण करत ८ गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने १.२२, १.५० मि. संरक्षण करत ४ गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात ८ गुण वसूल केले, गौरी शिंदेने १.२८ मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. तर पराभूत ओडिशाच्या माधुमिताने १.३६ मि. संरक्षण करत तब्बल १० गुण वसूल केले तर रंजिताने १.०८ मि संरक्षण करत ४ गुण मिळवत जोरदार लढत दिली. मात्र महाराष्ट्राने त्याची डाळ शिजू दिली नाही. पुरुषामध्ये केरळ व आंध्र प्रदेश तर महिलांमध्ये कर्नाटक व केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
याटिंग - वेदप्रकाश पाठकला रौप्य, तर सिखानसू सिंगला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सेनादलाच्या खेळाडूंना चिवट झुंज देत याटिंग स्पर्धेमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदकाची कमाई केली. वेदप्रकाश पाठकने रौप्यपदक जिंकले, तर सिखानसू सिंगने कांस्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील आर एस एक्स विंडसर्फिंग या प्रकारात वेदप्रकाशने १९ गुणांची नोंद केली. या प्रकारामध्ये १० शर्यतींचा समावेश असतो. त्यामध्ये सहा राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. तो सेनादलामध्ये असला तरी मुंबईत सराव करीत असल्यामुळे त्याने या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने यापूर्वी वरिष्ठ गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे. ईलका 7 या क्रीडा प्रकारात सिखानसूने तिसरे स्थान घेताना २६ गुण नोंदवले. या प्रकारामध्ये नऊ शर्यतींचा समावेश असतो. त्यामध्ये आठ राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. १७ वर्षीय खेळाडू सिखानसू हा मुंबई येथे आर्मी स्पोर्ट बॉईज संघात प्रशिक्षण घेत आहे. त्याने आजपर्यंत कनिष्ठ व वरिष्ठ गटात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
सायकलिंग - चिन्मयला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या चिन्मय केवलरामानीने रोड सायकलिंगमधील ४१ किलोमीटर वैयक्तिक् टाइम ट्रायल प्रकारात कांस्यपदक पटकावले. या शर्यतीत चिन्मयने ५७ मिनिटे, ३०.११ सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला. या गटात कर्नाटकच्या नवीन जॉनने (५५ मिनिटे, १९.३२ सेकंद) सुवर्णपदक आणि तामिळनाडूच्या श्रीनाथने लक्ष्मीकांतने (५६ मिनिटे, ३२.०४ सेकंद) रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राचा आणखी एक स्पर्धक प्रणव कांबळे (१ तास, ०२ मिनिटे, २१.०८ सेकंद) या शर्यतीत १२वा आला.
नेमबाजी - रुद्रांक्ष-अनन्या पात्रता फेरी ओलांडण्यात अपयशी
महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील आणि अनन्या नायडू जोडीला नेमबाजीमधील १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटाची पात्रता फेरी ओलांडण्यात अपयश आले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खात्यावर नेमबाजीचे अद्याप एकही पदक जमा झालेले नाही. पात्रता फेरीत रुद्रांक्ष आणि अनन्या जोडीने एकूण ६२४.९ गुण मिळवले. रुद्रांक्षने तीन मालिकांमध्ये अनुक्रमे १०४.२, १०४.९, १०४.७ गुण मिळवले. तर अनन्याने तीन मालिकांमध्ये अनुक्रमे १०३.३, १०५.१, १०२.७ गुण कमावले.
ज्युदो - मिश्र सांघिक गटात महाराष्ट्राला पदकाची हुलकावणी
ज्युदोमधील मिश्र सांघिक गटात महाराष्ट्राला टायब्रेकरमध्ये पदकाने हुलकावणी दिली. महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्यातील कांस्यपदकाच्या लढतीत ३-३ अशी बरोबरी झाली. महाराष्ट्राच्या समीक्षा शेलार (७० किलोखालील वजनी गट), अपूर्वा पाटील (७० किलोवरील) आणि विकास देसाई (९० किलोखालील) यांनी विजय मिळवले. तर श्रेया मोरे (५७ किलोखालील), त्रिभुवन बंगेरा (७३ किलोखालील) आणि सिद्धार्थ साळुंखे (९० किलोवरील) यांनी पराभव पत्करले. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये सिद्धार्थची हार झाली.
बीच हॅंडबॉल - कांस्यपदकाच्या रंगतदार लढतीत महाराष्ट्र पराभूत
सुवर्णगोलमध्ये निकाली ठरलेल्या बीच हॅंडबॉल क्रीडा प्रकाराच्या कांस्यपदकाच्या रंगतदार लढतीत महाराष्ट्राने छत्तीसगडकडून पराभव पत्करला. महाराष्ट्राने पहिल्या सेटमध्ये १३-१२ असा निसटता विजय मिळवला. दुसरा सेट मात्र १२-१४ असा गमावला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-३ अशी बरोबरी झाली. अखेरीस सुवर्णगोलमध्ये छत्तीसगडने २-१ अशी बाजी मारली. महाराष्ट्राकडून गोलरक्षक उज्ज्वला जाधव, बिना खडकुंभर्गे यांनी अप्रतिम खेळ केला.