(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chess Olympiad 2024 : लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात खेळाडू दोडके, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकूनही खेळाडूंकडे दुर्लक्ष
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णकमाई करणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडूंची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. पण....
Chess Olympiad 2024 Maharashtra Player Divya Deshmukh Vidit Gujrathi : भारताने बुद्धिबळाच्या इतिहासात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकण्याचा पराक्रम महिला आणि पुरुष बुद्धिबळपटूंनी केला. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णकमाई करणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडूंची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.
रविवारी झालेल्या अखेरच्या फेरीत भारतीय पुरुष संघाने स्लोव्हेनिया, तर महिला संघाने अझरबैजानचा पराभव करत सुवर्ण जिंकले. नाशिककर विदित गुजराथी, डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी आणि पेंटाला हरिकृष्णा यांचा पुरुष संघात समावेश होता.
नागपूरची दिव्या देशमुख, द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव या खेळाडू महिला संघात होत्या. खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन आणि महिला संघाचे अभिजित कुंटे यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या या विजयात महाराष्ट्रातील खेळाडूंची भूमिका महत्वाची होती. या दोन्ही संघात नागपूरच्या दिव्या देशमुख, नाशिकचे विदित गुजराती होते. महिलांच्या संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत महाराष्ट्रातील अभिजित कुंटे होते. मोदींनी काल कौतुक केलेले असले तरी, या मराठी खेळाडूंची महाराष्ट्र सरकारकडून अद्याप दखलही घेतली गेली नसल्याची खंत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांनी व्यक्त केली.
महिला चेस संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे म्हणाले की, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्षांपासून हे आमच स्वप्न होतं. आम्ही जिंकलो त्यानंतर मोदींनी अमेरिकेतील भाषणात याचा उल्लेख केला. दोन्ही गटात भारत जिंकला हे इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे. खूप लहान असताना मला क्रिकेट खेळण्यासाठी आईवडील घेऊन गेले, तेव्हा ते म्हणाले हा लहान आहे सिझन बॉलवर खेळणे जमणार नाही. मग तेव्हापासून मी चेस खेळतोय.
पुढे प्रशिक्षक अभिजित कुंटे म्हणाले की, ओपन संघाने 21 तर महिलांच्या संघाने 19 गुण असे 44 पैकी 40 गुण मिळवले ही मोठी गोष्ट आहे. आम्ही जिंकून परत येत असताना बसमध्येच मोदींच्या भाषणात आमच्या विजयाचा उल्लेख झालेला पाहिलं. मोदी काल भेटले तेव्हा म्हणाले की, तुमच यश सगळ्या जगापर्यंत पोहचल पाहिजे. त्यानंतर तामिळनाडू इत्यादी सरकारने त्यांच्या त्यांच्या खेळाडूंना पारितोषिक वगैरे दिलं. महाराष्ट्राच्या सरकारच्या कोणाकडून आपल्या मुलांना साधं एसएमएसदेखील आलेला नाही.
हे ही वाचा -