एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला नमवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीत विराट कोहलीच्या टीम इंडियाची आज श्रीलंकेसोबत लढत होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघांमधला हा सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल.
हा सामना जिंकला तर, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफित लोळवल्यानंतर भारत विजयी घोडदौड सुरु ठेवतो का, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
विराट कोहलीच्या टीम इंडियानं बर्मिंगहॅमच्या लढाईत पाकिस्तानला लोळवलं. टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर तब्बल 124 धावांनी विजय मिळवला.
आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारताचा सामना हा अँजेलो मॅथ्यूजच्या श्रीलंकेशी होत आहे. हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवण्यात येईल.
कशी आहे श्रीलंका संघाची ताजी कामगिरी?
श्रीलंकेच्या फलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी बजावली होती. पण कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने पोटरीच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यातून माघार काय घेतली आणि श्रीलंकेच्या फलंदाजीचं सारं समीकरणच बिघडलं. दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिर आणि ख्रिस मॉरिसच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेने अवघ्या 203 धावांत गाशा गुंडाळला. निरोशन डिकेवाला, कुशल मेंडिस, दिनेश चंडिमल, चमारा कपुगेदरा अशा गुणवान फलंदाजांची फळी आजही श्रीलंका संघात मौजूद आहे. पण त्यांच्या गुणवत्तेला एकत्र आणण्यासाठी अँजेलो मॅथ्यूजचं भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणं श्रीलंकेसाठी गरजेचं आहे. त्यात उपुल थरंगावर दोन सामन्यांच्या बंदीची झालेली कारवाई श्रीलंकेची आणखी पंचाईत करणारी ठरली आहे.
अँजेलो मॅथ्यूजचं श्रीलंकेच्या फलंदाजीत जे स्थान आहे, तेच त्याच्या आक्रमणात लसिथ मलिंगाचं आहे. मलिंगाचा एखादा भन्नाट स्पेलही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. पण श्रीलंकेच्या दुर्दैवाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांमध्ये असो किंवा सलामीच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेचं आक्रमण सपशेल अपयशीच ठरलं.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने सराव सामन्यांमध्ये श्रीलंकेने दिलेल्या तीनशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. मग सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यात 50 षटकांत सहा बाद 299 धावांची मजल मारली होती.
टीम इंडियाचं बलस्थान
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना दिलेली ती ट्रिटमेंट रिपीट करण्याची क्षमता भारतीय फलंदाजांमध्येही आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी धावांचा रतीब घातला होता. पण बर्मिंगहॅमच्या प्रतिकूल वातावरणात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांकडून केलेल्या धावांच्या वसुलीला तर तोडच नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवनने त्या सामन्यात रचलेल्या भक्कम पायावर विराट कोहली, युवराजसिंग आणि हार्दिक पंड्यानं धावांचा कळस चढवला.
वास्तविक फलंदाजी हे टीम इंडियाचं आधीपासूनच बलस्थान होतं. पण आजच्या जमान्यात भारतीय आक्रमणाही कमालीचं धारदार बनलं आहे.
भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजानं रविवारच्या सामन्यात पाकिस्तानची आख्खी फौज 163 धावांत गुंडाळली. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय रणनीतीत बदल करायचा, तर ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. कारण श्रीलंकेच्या फळीत डावखुरे फलंदाजही आहेत. त्या डावखुऱ्या फलंदाजांचा काटा काढण्यासाठी अश्विन रामबाण उपाय ठरु शकतो. पण अश्विनला फायनल इलेव्हनमध्ये घ्यायचं, तर भुवनेश्वर, उमेश आणि बुमरा यांच्यापैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल.
इंग्लंडच्या रणांगणात एका वेगवान गोलंदाजाला वगळून, अश्विनच्या ऑफ स्पिनवर विश्वास टाकायचा, धोका विराट कोहली स्वीकारणार का, हाच प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement