एक्स्प्लोर
एशियाड कबड्डीत भारताच्या पुरुष संघाचं गर्वहरण
जकार्ता एशियाडच्या उपांत्य सामन्यात भारताला इराणकडून 18-27 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताच्या पुरुष संघाला यंदा कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. एशियाड कबड्डीत भारतीय पुरुषांच्या ढिसाळ कामगिरीची काय आहेत कारणं? जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांच्या रिपोर्टमधून...
Asian Games 2018 : अखेर इराणकडून झालेल्या पराभवाने भारतीय पुरुषांचं एशियाड कबड्डीतलं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं. इराणने हा सामना 2718 असा जिंकला आणि एशियाडच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
इराणकडून झालेला पराभव भारतीय कबड्डीसाठी धक्कादायक ठरला, कारण गेल्या सात एशियाडमध्ये भारतीय पुरुषांनी कबड्डीची सलग सात सुवर्णपदकं जिंकली होती. एशियाड कबड्डीतली भारतीय पुरुषांची ती मक्तेदारी यंदा इंडोनेशियात मोडून निघाली.
एशियाडच्या रणांगणात भारतीय पुरुषांना कबड्डीत यंदा दोन पराभवांना सामोरं जाण्याची वेळ आली. पुरुष गटाच्या साखळीत भारताला पराभवाची पहिली ठेच लागली. भारतानं दक्षिण कोरियाकडून 23-24 अशी सनसनाटी हार स्वीकारली. त्या धक्क्यातून सावरायच्या आत इराणने भारताला उपांत्य फेरीतूनच गाशा गुंडाळायला लावला.
एशियाड कबड्डीत भारतीय पुरुषांचं गर्वहरण होण्यामागं अनेक कारणं आहेत. पण त्यातही समाधानाची बाब म्हणजे दक्षिण कोरिया आणि इराणकडून झालेला भारताचा पराभव म्हणजे कबड्डीची अन्य देशांत प्रगती होत असल्याचं लक्षण आहे. कबड्डी खेळाच्या भवितव्यासाठी ही बाब नक्कीच चांगली म्हणावी लागेल. एका जमान्यात राष्ट्रीय कबड्डीत महाराष्ट्राची मक्तेदारी होती. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, ‘ज्या दिवशी राष्ट्रीय कबड्डीत महाराष्ट्राचा पराभव होईल, त्या दिवशी कबड्डीची प्रगती सुरू झाली असं मी मानेन.’ त्याच पार्श्वभूमीवर एशियाड कबड्डीत झालेला भारताचा पराभव म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचा विकास होत असल्याचं चित्र आहे.
आता पाहूयात एशियाड कबड्डीत भारतीय पुरुषांवर दक्षिण कोरिया आणि इराणकडून पराभूत होण्याची वेळ का आली?
एशियाडच्या मैदानात कबड्डीचा दम पहिल्यांदा घुमला तो 1990 साली. त्या काळात पाकिस्तानचा अपवाद वगळता अन्य देशांमध्ये कबड्डीने बाळसं धरलेलं नव्हतं. त्यामुळे त्या काळात आंतरराष्ट्रीय कबड्डीवर भारताने वर्चस्व गाजवलं. पण 2004 साली मुंबईत झालेल्या पहिल्या विश्वचषकानं कबड्डी खेळाला पहिली चालना मिळाली. त्यानिमित्ताने भारतीय प्रशिक्षकांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आलं. त्या प्रशिक्षकांनीच इराण, दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये कबड्डीचं प्रगत प्रशिक्षण दिलं. पुढच्या दहा वर्षांत या देशांनी कबड्डीत तगडे संघ उभे केले आहेत.
मग 2014 साली प्रो कबड्डी लीगच्या टेलिव्हिजन प्रशिक्षणातून कबड्डीचे बारकावे जगाला शिकायला मिळाले. त्याचाच परिणाम आपल्याला प्रामुख्यानं इराण आणि दक्षिण कोरियासारख्या संघांच्या एशियाडमधल्या कामगिरीत पाहायला मिळाला.
भारतीय पुरुषांच्या एशियाड कबड्डीतल्या अपयशाचं तिसरं कारण म्हणजे सदोष संघनिवड. एशियाडसाठीची संघनिवड ही प्लेसनुसार झालेली नव्हती. त्यामुळंच भारतीय संघात डाव्या आणि उजव्या मध्यरक्षकाची उणीव असल्याचं इराणसमोर स्पष्ट दिसून आलं. त्यामुळं इराण आणि दक्षिण कोरियासमोर भारताची ‘कव्हर’ फुसका बार ठरली. त्याउलट इराण आणि दक्षिण कोरियाची क्षेत्ररक्षण इतकं उत्तम होतं की, त्यांच्या कव्हरच्या वेढ्यातून भारतीय चढाईपटूची सुटका होणं मुश्किल ठरायचं.
धक्कादायक बाब म्हणजे भारतीय संघाच्या सदोष निवडीला जाणीवपूर्वक घेण्यात आलेले निर्णयच कारणीभूत आहेत. भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनमधल्या जनार्दनसिंग गेहलोत यांच्या एकाधिकारशाहीत वर्षानुवर्ष चालत आलेली आर्थिक गणितं या सदोष संघनिवडीमागं असल्याची चर्चा भारतीय कबड्डीत आहे. यंदा एशियाडच्या निवडीतून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या खेळाडूंना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं होतं. त्या प्रकरणात होनप्पा आणि राजरत्नमसारख्या दिग्गज खेळाडूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. एशियाडमधल्या कोणत्याही पदकासाठी केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या रोख इनामात खेळाडूंना टक्केवारी द्यावी लागते म्हणे. तीच बाब प्रो कबड्डी लीगच्या लिलावाच्या घसघशीत बोलीसाठीही लागू करण्यात असं दबक्या आवाजात सांगितलं जातं.
भारतीय कबड्डीतल्या एकाधिकारशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची हिंमत होनप्पा आणि राजरत्नम यांनी दाखवली आहे. पण भारतीय कबड्डीतल्या एकाधिकारशाहीइतकीच, त्या एकाधिकारशाहीसमोरची इतरांची लाळघोटी वृत्तीही उबग आणणारी आहे. होनप्पा आणि राजरत्नमनं त्या वृत्तीलाच सर्वोच्च न्यायालयात खेचण्याची हिंमत दाखवली आहे. आता त्या दोघांना विविध राज्यांकडून कशी साथ मिळते, यावरच ठरेल की, भारतीय कबड्डीचा कारभार भविष्यात तरी सुधारणार की नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement