Asian Games 2018 : पुुरुष संघाला हॉकीत कांस्य पदक, पाकिस्तानचा 2-1नं पराभव
पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताला मलेशियाकडून, तर पाकिस्तानला जपानकडून हार स्वीकारावी लागली होती.
जकार्ता : एशियाडमध्ये भारताच्या पुरुष संघानं पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून, हॉकीत कांस्य पदकाचा मान मिळवला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताला मलेशियाकडून, तर पाकिस्तानला जपानकडून हार स्वीकारावी लागली होती.
त्यामुळे कांस्यपदकासाठी भारत आणि पाकिस्तान या उपांत्य पराभूत संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताकडून आकाशदीपसिंगनं चौथ्या, तर हरमनप्रीतसिंगनं पन्नासाव्या मिनिटाला एक-एक गोल झळकावला. पाकिस्तानकडून अतिक मोहम्मदनं बावन्नाव्या मिनिटाला एकमेव गोलची नोंद केली.
चार वर्षापूर्वी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघांनं एशियाडमध्ये कांस्य पदक जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. भारत या एशियाडमध्ये एकूण 69 पदकांच्या कमाईसह आठव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकं आहेत.
इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारतानं आजवरच्या इतिहासात सर्वाधिक पदकांची कमाई करून नवा विक्रम घडवला. एशियाडच्या इतिहासात भारतानं 2010 साली सर्वाधिक 65 पदकांची कमाई केली होती. चीन 129 सुवर्ण पदकांसह एकूण 283 पदक जिंकत अव्वल स्थानी आहे.