India Vs Pakistan Asia Cup: यंदाच्या आशिया कपचं यजमानपद पाकिस्तानकडेच; टीम इंडियासाठी पीसीबीनं आखलीये खास योजना
India Vs Pakistan Asia Cup: आशिया कप 2023 हंगामासाठी पीसीबीनं एक नवी योजना आखली आहे. यावेळी ही स्पर्धा केवळ पाकिस्तानच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे.
India Vs Pakistan Asia Cup: यंदा पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेचे प्रकरण निकाली लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी व्हावा यासाठी नवी योजना आखली आहे. या योजनेनुसार, भारतीय क्रिकेट संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही.
दरम्यान, आशिया कप 2023 च्या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडेच जाण्याची शक्यता आहे. तर आशिया कप 2023 मध्ये सहभागी होणारा भारतीय क्रिकेट संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. आशिया कप स्पर्धेचं यजमानपद स्वतःकडे घेण्यासाठी पीसीबीनं हा उपाय शोधला आहे. भारतीय क्रिकेट संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळणार आहे.
भारतीय संघाचे सामने पाकिस्तानच्या बाहेर
आशिया कपसंदर्भात टीम इंडियाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ESPNcricinfo ने आपल्या अहवालात या संपूर्ण योजनेची माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचं ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाईल, असंही पीसीबीनं म्हटल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
आशिया कप स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, यूएईमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला तापमान साधारणपणे 40 अंश सेंटीग्रेडच्या आसपास असतं. मात्र, अशा हवामानातही तिथे अनेकदा क्रिकेटचे सामने खेळवले जातात. आयपीएल 2021 चा हंगामही सप्टेंबरच्या अखेरीस यूएईमध्येच खेळवण्यात आला होता. 2021 T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचे काही सामनेही ओमानची राजधानी मस्कत येथे खेळवले गेले होते. तसेच, इंग्लंड देखील आशिया कपच्या सामन्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Presenting the @ACCMedia1 pathway structure & cricket calendars for 2023 & 2024! This signals our unparalleled efforts & passion to take this game to new heights. With cricketers across countries gearing up for spectacular performances, it promises to be a good time for cricket! pic.twitter.com/atzBO4XjIn
— Jay Shah (@JayShah) January 5, 2023
आशिया चषक स्पर्धेत यावेळी एकूण 13 सामने खेळवले जाणार
आशिया चषक स्पर्धेत यंदा केवळ 6 टीम सहभागी होणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, गतविजेती श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक क्वालिफायर टीम यंदा आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. या सर्व टीम दोन गटात विभागल्या जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत 6 टीममध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत.
यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय ठरतील. उपांत्य फेरीत 4 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीनं एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. अशा प्रकारे आशिया कप 2023 मध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होणार?
यावेळी आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या ग्रुपमधील तिसरी टीम क्वालिफायर राउंडमधून उतरेल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या ग्रुपमध्ये राहतील. यावेळीही स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात किमान तीन सामने होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sunil Gavaskar on Team India: "आयपीएल सुरु होतंय, पण..."; सुनील गावस्कर यांनी टोचले टीम इंडियाचे कान