IND vs PAK: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सनं पराभव; विराटचं अर्धशतक व्यर्थ
IND vs PAK, Asia Cup 2022: दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.
IND vs PAK, Asia Cup 2022: दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघानं सहा विकेट्स आणि एक चेंडू राखून भारताचा पाच विकेट्सनं पराभव केला.
भारतानं दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बाबर 14 धावा करून बाद झाला. फखर जमाननं 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोक्याची क्षणी मोहम्मद नवाजनं पाकिस्तानसाठी 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यानंतर आसिफ अली आणि खुशदिल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 17 चेंडूंत 33 धावांची भागीदारी झाली. मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं पाकिस्तानसाठी 51 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारताला पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि रवि बिश्नोईनं यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली भारतीय सलामी जोडी केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. पण पॉवरप्लेपूर्वी कर्णधार रोहित (28) रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतानं पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शादाबच्या चेंडूवर बाद झाला. त्यानं 28 धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवनं भारताचा डाव सावरला. परंतु, 10 व्या षटकात नवाजने सूर्यकुमार यादवच्या (13 धावा) रुपात भारताला चौथा धक्का दिला. या सामन्यातही ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. शादाबने पंतला (14) बाद करून दुसरी विकेट मिळवली. पाकिस्तानविरुद्ध गट सामन्यात धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळं भारताचा निम्मा संघ 132 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
अखेरच्या षटकात पाकिस्तानची भेदक गोलंदाजी
सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडानं कोहलीसह 17.1 षटकांत संघाची धावसंख्या 150 वर नेली. दरम्यान, कोहलीनं हसनैनच्या चेंडूवर षटकार ठोकून या स्पर्धेतील आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. 19 व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या नसीमने हुडाला (16) बाद करून भारताला 168 धावांवर सहावा धक्का दिला. अखेरच्या षटकात रौफनं चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळं भारताला 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून शादाब खाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ आणि नवाजनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
हे देखील वाचा-