(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HK vs PAK, Match Highlight : पाकिस्तानचा हाँगकाँगवर मोठा विजय, 155 धावांनी दिली मात, अवघ्या 38 धावांत हाँगकाँग सर्वबाद
Asia Cup 2022, HK vs PAK: ग्रुप ए मधील पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात पाकिस्तानने 155 धावांनी विजय मिळवत सुपर 4 मध्ये जागा मिळवली आहे.
India vs Pakistan, Asia Cup 2022 : संयुक्त अरब अमीरात (UAE) येथे सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) ग्रुप ए मधील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगला 155 धावांनी मात देत सुपर 4 फेरी गाठली आहे. पाकिस्तानने उत्तम फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत विजय मिळवला. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ ग्रुप ए मधून सुपर 4 मध्ये पोहोचले असून ग्रुप बी मधील दोन पात्र संघांसोबत सुपर 4 मध्ये राऊंड रॉबिन पद्धतीनं सामना खेळवला जाईल.
याआधी अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी सुपर-4 मध्ये स्थान निश्चित केलं असून आता पाकिस्ताननं हाँगकाँगला तगडी मात देत सुपर 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे यामुळे आता सुपर 4 मध्ये रविवारी 4 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे.
कसा पार पडला सामना?
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात सर्वात आधी हाँगकाँगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पाकिस्तानला कमी धावांत राखून निर्धारीत लक्ष गाठण्याचा त्यांचा डाव होता. पण पाकिस्तानच्या रिझवान आणि फखर जमान यांनी दमदार अर्धशतकं ठोकत अनुक्रमे 78 आणि 53 धावा ठोकल्या. खुशदील याने 35 धावा ठोकत फिनीशिंग टच दिला. ज्यामुळे पाकिस्तानने 20 षटकात 193 धावा केल्या. ज्यानंतर हाँगकाँगचा संघ फलंदाजीला आला असता पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठू दिली नाही. त्यामुळे 10.4 षटकात हाँगकाँग 38 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे पाकिस्तान 155 धावांनी जिंकला.
आशिया चषक 2022 सुपर-4 चं वेळापत्रक
1) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका- 3 सप्टेंबर 2022
2) भारत विरुद्ध पाकिस्तान 4 सप्टेंबर 2022
3) भारत विरुद्ध श्रीलंका- 6 सप्टेंबर 2022
4) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान 7 सप्टेंबर 2022
5) भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 8 सप्टेंबर 2022
6) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 9 सप्टेंबर 2022
हे देखील वाचा-