T20I Rankings: सूर्यकुमार यादव सुसाट! बाबर आझमचं अव्वल स्थान धोक्यात? आशिया चषकातच उलटफेर होण्याची शक्यता
Asia Cup 2022: पाकिस्तानचा सलामी फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आयसीसी टी-20 फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे.
Asia Cup 2022: पाकिस्तानचा सलामी फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आयसीसी टी-20 फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. पंरतु, त्याचं हे स्थान धोक्यात आहे. भारताचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) त्याला जोरदार टक्कर मिळत आहे. सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतच सुर्यकुमार यादव बाबर आझमकडून अव्वल स्थान हिसकावून घेण्याची दाट शक्यता आहे.
बाबर आझम आणि सूर्यकुमार यांच्यात फक्त 24 गुणांच अंतर
आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीनुसार, बाबर आझम 818 अंकासह अव्वल स्थानावर आहे. तर, पाकिस्तानाचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद रिझवानच्या खात्यात 796 गुण आहेत. यानंतर सूर्यकुमार यादव 793 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, बाबर आझम आणि सूर्यकुमार यांच्यात फक्त 24 गुणांचं अंतर आहे. हे खूप छोटं अंतर आहे, ज्याला दोन-तीन डावात मागं गाठलं जाऊ शकतं.
सूर्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघ सुपर-4 टप्प्यात तीन सामने खेळणार आहे. सुपर 4 मध्ये भारतानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठली तर सूर्यकुमारला चौथा सामनाही खेळण्याची संधी मिळू शकते. या चार सामन्यानं सूर्यानं दमदार खेळी केल्यास तो आयसीसी टी-20 फलंदाजाच्या क्रमावारीत अव्वल स्थान गाठेल. महत्वाचं म्हणजे, सूर्यकुमारचं अव्वल स्थानी पोहचणं बाबर आणि रिझवानच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
सूर्यकुमारची टी-20 क्रिकेटमधील कामगिरी
सूर्यकुमार यादवनं गेल्या वर्षी मार्च 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत भारतासाठी 25 सामने खेळले आहेत. या सामन्यात सहा अर्धशतकं आणि एका शतकाच्या मदतीनं 758 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 39.89 आणि स्ट्राइक रेट 177.51 इतका होता. आशिया चषकातील भारताच्या शेवटच्या सामन्यात हाँगकाँगविरुद्ध त्यानं 26 चेंडूत 68 धावांची तडाखेबाज खेळी खेळली होती.
पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार?
पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज निर्णायक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघाला सुपर-4 चं तिकीट मिळेल. हाँगकाँगच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ अधिक मजबूत आहे. यामुळं पाकिस्तानचं सुपर-4 मध्ये जागा मिळवणं जवळपास निश्चित मानलं जातंय.
हे देखील वाचा-