पाकिस्तानला दणका, भारताच्या नकारामुळे पाकने आशिया कप स्पर्धेचं यजमानपद गमावलं
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या तीव्र विरोधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशिया चषक 2020 या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या तीव्र विरोधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशिया चषक 2020 या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. परंतु, आता ती स्पर्धा दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी एका देशात खेळवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानमधील सुरक्षेचं कारण पुढे करत भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. जर ही स्पर्धा पाकिस्तानात झाली तर आम्ही या स्पर्धेतून माघार घेऊ, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. भारताच्या या दबावापुढे आशियाई क्रिकेट असोसिएशन आणि पाकिस्तान क्रिकेड बोर्डाला नमतं घ्यावं लागलं आहे.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सीमांवरील तणाव वाढला आहे. काश्मीर, कलम 370, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन दोन्ही देशांमधील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. अशा परिस्थिती भारताने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे.
यंदाची आशिया चषक स्पर्धा टी-20 प्रकारात (फॉरमॅट) खेळली जाणार आहे. या वर्षीच्या अखेरीस होणऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया चषक स्पर्धा टी-20 पद्धतीने खेळली जाणार आहे.