स्पर्धेच्या अन्य गटात खेळाडूंची संख्याही फार मोठी आहे आणि खेळाडूही चांगल्या तयारीत असल्यामुळे या गटांमधून सहा खेळाडूंची निवड करणे पंचांसाठी फार मोठे आव्हान असेल. 55 किलो वजनी गटात संदेश सकपाळला नितीन शिगवण आणि कल्पेश भोईरचे आव्हान असेल. 60 किलो वजनी गटात पुण्याच्या श्रीनिवास वास्केचे तगडे आव्हान आदित्य झगडे, प्रतिक पांचाळ आणि जगदीश कदम या मुंबईकरांनाच झेलावे लागणार आहे. 70 किलो वजनी गटात अमित सिंग, विघ्नेश पंडित या मुंबईकरांसह रविंद्र वंजारी(जळगाव), मनीष ससाणे (पुणे), श्रीनिवास खारवी (प.ठाणे) आणि जयेंद्र मयेकर (रायगड) हे दमदार खेळाडू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील.
2/6
महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा असणार हे पक्के झालं आहे. राज्यभरातून दोनशे पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग असला तरी अंतिम फेरीसाठी सर्वाधिक खेळाडू मुंबई आणि उपनगरचेच पात्र ठरले असून दहा पैकी किमान पाच गटात मुंबईचे खेळाडू बाजी मारतील, असा विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत मुंबईचेच वर्चस्व दिसणार हे स्पष्ट आहे.
3/6
सर्वात तगडा गट हा 95 किलोचा वजनी गट असून या गटात दोन महेंद्र एकमेकांशी भिडणार आहेत. यापैकीच एक हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी सुनीतशी मुकाबला करेल. 100 किलोवरील हेवीवेट गटात गतवर्षीचा मुंबई श्री अतुल आंब्रे हा अक्षय मोगरकरशी दोन हात करेल. चार वेळा महाराष्ट्र श्री ठरलेल्या सुनीत जाधवला गटात फारसे संघर्ष करावे लागणार नाही. त्याच्या गटात सचिन डोंगरे हा मुंबईचाच खेळाडू आहे. त्याचबरोबर सचिन वानखेडे आणि योगेश सिलबेरी हेसुद्धा चांगले खेळाडू या गटातून खेळणार असून सुनीतसमोर कुणाचेच आव्हान टिकणार नसल्याचे प्राथमिक फेरीतच स्पष्ट झाले.
4/6
पाच तासांच्या वजन तपासणीनंतर सुरू झालेल्या प्राथमिक फेरीत मोठ्या गटात महेंद्र चव्हाण, सचिन डोंगरे, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे यांची भव्य शरीरयष्टी पाहून महाराष्ट्र श्री साठी कडवा संघर्ष होणार हे दिसत होते. मात्र तेव्हाच महेंद्र पगडे या एका जबरदस्त खेळाडूची एण्ट्री पाहून महाराष्ट्र श्री किती थरारक असेल याची खरी कल्पना आली.
5/6
क्रीडाप्रेमी कृष्णा पारकर यांच्या पुढाकारामुळे अभिनव फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित महाराष्ट्र श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अनेक वर्षानंतर प्रथमच प्रचंड संघर्ष आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील तब्बल 190 खेळाडूंनी मुख्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला तर फिजीक स्पोर्ट्स प्रकारात 52 पुरूष तर 10 महिलांनी आपल्या फिटनेसचे स्फूर्तीदायक दर्शन घडवले. महाराष्ट्राच्या 22 जिह्यांमधून आलेल्या पीळदार खेळाडूंमुळे वांद्य्राच्या उत्तर भारतीय संघाची आज छाती अभिमानाने फुगली होती. प्राथमिक फेरीसाठी शेकडोच्या संख्येने खेळाडू जमा झाल्यामुळे सभागृहात जिकडे तिकडे आखीव रेखीव देहयष्टीचे खेळाडूच दिसत होते.
6/6
मुंबईत रविवारी रंगणाऱया ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत मुंबईचीच ताकद दिसणार आहे. शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून मुंबई आणि उपनगरचेच 20 पेक्षा अधिक खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र जेतेपदाच्या लढतीत सुनीत जाधवसमोर यंदा महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर, रोहित शेट्टी, अजय नायर, सुजन पिळणकर अशा एकापेक्षा एक खेळाडूंचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे सुनीतला सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्रीचा मान मिळविण्यासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.