Rain News : पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क
यवतामळ (Yavatmal) जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं महाराष्ट्र आणि तेलंगणा (Maharashtra Telangana) राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे.
Rain News : सध्या राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं काही भागाज जनजीवन विस्कळीत झालं आहे. यवतामळ (Yavatmal) जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं महाराष्ट्र आणि तेलंगणा (Maharashtra Telangana) राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 44 हा पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बंद पडला आहे. सायंकाळी पैनगंगा नदी (Painganga River) फुगली आणि पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी पाणी पुलाला टेकताच दोन्ही राज्याच्या प्रशासनाने सीमेवर तैनात होऊन सतर्कतेचा ईशारा देऊन वाहतूक थांबवली. त्यानंतर पाणी पुलावर आल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरुन जात असल्यानं वनसडी-अंतरगाव आणि भोयगाव-धानोरा मार्ग बंद पडला आहे. तर पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं परसोडा, रायपुर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव, भोयगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोटंबा गावाला पुराचा वेढा
यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील कोटंबा गावाला पुराचा वेढा पडला आहे. बोरगाव धरण क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर आणि शेतशिवारात शिरलं आहे. त्यानंतर कोटंबा गावाला पुराणे वेढले आहे. गावातील अनेक घरात पाणी शिरल्यानं ग्रामस्थ सुरक्षितस्थळी निघाले आहेत. अनेकांनी घरांवर आणि झाडावर आश्रय घेतला आहे. कोटंबाकडे जाणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर नायगाव येथील पूल देखील पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळं परिसरातील चार गावांचा संपर्क तुटला आहे.
शेती पिकांचे मोठे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विजांचा कडकडाटात पावसाचे रौद्रवतार पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आजपर्यंतच्या इतिहासात अल्प कालावधीत यवतमाळ महागाव, आर्णी , घाटंजी, कळंब, दारव्हा दिग्रस तर इतर काही तालुक्यात 150 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस पडला आहे. दोन दिवसात एसडीआरएफची दोन पथके आणि जिल्हा आपत्ती विभागाकडू 266 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर 40 हजार हेक्टर वरील जास्त पिके पाण्यामुळे खरडून गेली. यवतमाळच्या वाघाडी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी थेट काठावर असलेल्या 50 ते 60 नागरिकांच्या घरात शिरल्याची घटना घडली. यामुळं घरातील धान्य, कपडे इतर साहित्य संपूर्ण वाहून गेले आहे. कोणी घरावर चढले तर काहींनी झाडावर आसरा घेतला.
महत्त्वाच्या बातम्या: