गावात प्रत्येकाच्या घरासमोर नळ, मात्र अद्याप पाणीपुरवठा नाही, नदीवर पाणी भरायला गेलेल्या चिमुकलीची दुर्दैवी अंत! मंत्री अशोक उईकेंचा सरकारला घरचा आहेर
Yavatmal News : वेदिका चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून 30 एप्रिल पर्यंत अहवाल येऊन दोषींवर कारवाई करू, असे मोठं विधान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी केलं आहे.

Yavatmal News : वेदिका चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी (Vedika Chavan Death Case) चौकशीचे आदेश दिले असून 30 एप्रिल पर्यंत अहवाल येऊन दोषींवर कारवाई करू, असे मोठं विधान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी केलं आहे. पाणी भरायला नदीवर गेलेल्या वेदिकाचा बुडून झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रशासनिक अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेची नोंद घेऊन कारवाईची सूचना दिल्या असल्याचे ही ते म्हणाले.
वेदिकाचा मृत्यू शासनासाठी भूषणावह नाही- अशोक उईके
"हर घर नल से जल" योजनेअंतर्गत पाण्याची पाइपलाइन टाकली. मात्र अजून पाणी मिळाले नाही, याची चौकशी केली जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. अशा माहितीही मंत्री अशोक उईके यांनी दिली. "हर घर नल से जल" योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारश मी करणार आहे. वेदिकाचा मृत्यू शासनासाठी भूषणावह नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. एक आदिवासी मुलगी नदीत पाणी भरताना बुडून मरते या घटनेला शासन गांभीर्याने घेईल. आर्णी तालुक्यात पाणीटंचाईचा आढावा घेतला होता. त्या आढाव्यात काही ठराविक गाव राहिलं असतील. मात्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी मिळालंच पाहिजे. असे ही ते म्हणाले. तर 30 एप्रिलपर्यंत चौकशीचा अहवाल येईल आणि कारवाई केली जाईल, असेही मंत्री अशोक उईके म्हणाले.
गावात प्रत्येकाच्या घरासमोर नळ, मात्र अद्याप पाणीपुरवठा नाही
पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जिवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आलीय. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वेदिका चव्हाण या बारा वर्षांच्या मुलीचा नदीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एक वर्षांपासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आलीय. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला तोटी लावून पाणीपुरवठा सुरू करू शकलेलं नाही. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंपही चार महिन्यांपासून नादुरूस्त झालाय. त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरूष लहान मुलांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करत अरूणावती नदीतून पाणी आणावं लागतं. त्यातच 12 वर्षीय वेदीकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय.
संतापजनक! मृत्यूनंतर प्रशासनाने नादुरूस्त हँडपंप झाकून ठेवला
संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाने नादुरूस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झालेत. मात्र प्रशासन एक दोन टँकर पाठवण्यासारख्या थातूरमातूर उपाययोजना करतंय. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावात प्रचंड रोष आहे. एबीपी माझाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला मात्र कोणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या























