Monkeypox : मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14,000 रुग्णसंख्या आफ्रिकेत पाच जणांचा मृत्यू; WHO ची माहिती
WHO reports 14000 cases of monkeypox : काही दिवसांपूर्वी WHO ने जगभरात मंकीपॉक्स संसर्गाच्या 11634 रुग्णसंख्येची पुष्टी केली होती. मात्र गुरुवारी हा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे.
![Monkeypox : मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14,000 रुग्णसंख्या आफ्रिकेत पाच जणांचा मृत्यू; WHO ची माहिती WHO reports 14000 cases of monkeypox globally five deaths in Africa marathi news Monkeypox : मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14,000 रुग्णसंख्या आफ्रिकेत पाच जणांचा मृत्यू; WHO ची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/058c9053d212fadd135c51c78c03e7c1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WHO Reports 14000 Cases Of Monkeypox : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात मंकीपॉक्सच्या 14,000 रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. तर आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओचे महासचिव टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.
मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय?
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हे सर्व मृत्यू आफ्रिकेत झाले आहेत आणि हा तोच प्रदेश आहे जिथे मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव ऐतिहासिकदृष्ट्या आढळून आला आहे. गुरुवारी, WHO एका समितीची दुसरी बैठक बोलावण्यात येणार आहे, ज्यामध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे की नाही हे ठरवण्यात येणार आहे.
मंकीपॉक्सचा झपाट्याने प्रसार
15 जुलै रोजी WHO ने जगभरात मंकीपॉक्स संसर्गाच्या 11634 रुग्णसंख्येची पुष्टी केली होती. मात्र गुरुवारी हा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे. अशाप्रकारे चार दिवसांत संसर्गाचे सुमारे अडीच हजार रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत अमेरिका, कॅनडामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, मंकीपॉक्सचा संसर्ग आतापर्यंत जगातील 75 हून अधिक देशांमध्ये आढळून आला आहे.
भारतात दुसरा रुग्ण सापडला
भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून केरळमधील कन्नूमरमधे 31 वर्षाच्या युवकाला त्याची लागण झाल्याचं समोर आलं आहे.हा व्यक्ती 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचा दुसरा रुग्ण सापल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी दिली आहे. या आधी 14 जुलै रोजी केरळमध्येच मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. यूएईवरून आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीला त्याची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता दुसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत खबरदारीचे सर्व उपायांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)