(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Walmart Store Shooting : अमेरिकेत गोळीबार; वॉलमार्ट स्टोअरमध्ये फायरिंग 10 लोकांचा मृत्यू
US Walmart Store Shooting : वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितलं आहे.
US Walmart Store Shooting : पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका (America) पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये (America Walmart Store Shooting) झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गोळीबारात अनेक लोक जखमीही झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच चेसापीक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथून पळ काढणाऱ्या शूटरला बॅटलफिल्ड ब्लाव्ड येथे पकडण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी त्याच्यावर गोळीबारही केला.
गोळीबार करणारा ठार; पोलिसांचा दावा
चेसापीक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या घटनेत सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या घटनेत बरेच लोक जखमी झाले आहेत. पोलीस या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ठार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून तपास सुरु आहे. पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाहून लोकांची गर्दी हटवली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती देणारा फोन पोलिसांना आला होता.
वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं मीडिया आउटलेट WAVY च्या मिशेल वुल्फ यांनी सांगितलं. यासोबतच 40 हून अधिक आपत्कालीन वाहनंही वॉलमार्ट बाहेर सज्ज आहेत. पोलीस विभागानं स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितलं आहे.
मॅनेजरचा कर्मचाऱ्यांवर गोळीबार
डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा मॅनेजर असल्याचं सांगितलं आहे. मॅनेजर ब्रेक रूममध्ये घुसला आणि दुकानातील इतर कर्मचाऱ्यांवर बेशूट गोळीबार केला.
अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच
अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराचा सिलसिला थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराचं वृत्त समोर येत आहे. फक्त दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका समलैंगिक नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारीनं गोळीबार केला, ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shraddha Murder Case : रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; आरोपी आफताबची कोर्टात कबुली