(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shraddha Murder Case : रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; आरोपी आफताबची कोर्टात कबुली
Shraddha Murder Case: आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येची दिली कबुली. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली, आफताबची दिल्लीतील साकेत कोर्टात दिली कबुली
Shraddha Murder Case: देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टात कबुल केलं आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आफताबनं दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालानं न्यायालयात सांगितलं की, "घटना क्षणार्धातच घडली. तपासात सहकार्य करत असल्याचंही त्यानं कोर्टाला सांगितलं. तसेच पुढे बोलताना मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही त्यांनं कोर्टाला सांगितलं.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची सतत दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. आफताबनं चौकशीदरम्यान सांगितलं की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्यानं तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. त्यानंतर ते ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिले होते. आफताबनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलग दोन दिवस ब्लेड्सचा शोध घेतला. पण तिथे काहीच सापडलं नाही. बुधवारी (23 नोव्हेंबर) पोलीस पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार असून यावेळी पोलीस आफताफला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे.
आफताबनं यापूर्वी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रं जंगलात फेकल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. श्रद्धाचं शीर कुठे आहे? पोलिसांच्या या प्रश्नाला उत्तर देतानाही त्यानं अनेकदा आपला जबाब बदलला आहे. आज आफताबला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली होती. सूत्रांनी सांगितलं की, दिल्ली पोलीस पुन्हा एकदा गुरुग्रामच्या जंगलात शोध घेऊ शकतात. शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 14 पथकं तयार केली आहेत.
दरम्यान, श्रद्धाच्या हत्येच्या आरोपाखाली आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आफताबनं मे महिन्यात श्रद्धाची हत्या केली होती. हत्येनंतर त्यानं निर्दयीपणे मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दररोज एक एक करून फेकून दिले. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा श्रद्धाशी बरेच दिवस संपर्क होऊ न शकल्यामुळे तिच्या मित्रांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून हत्येचा छडा लावला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :