निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच, तरीही कॅनडानं...; न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानं खळबळ
India Canada Tension: न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनं कॅनडाला गुप्त माहिती दिली होती, परंतु कॅनडानं याचा अर्थ वेगळाच काढला आणि थेट संसदेतच सर्व माहिती जाहीर केली.
India Canada Tensions: खलिस्तानवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मात्र खलिस्तानवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकी गुप्तचर संस्थांनीच त्याबद्दलचे पुरावे कॅनडाला दिले होते, असा दावा संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'नं दिलं आहे. ही माहिती सार्वजनिक करण्यासाठी दिली गेली नव्हती, कॅनडाच्या पंतप्रधानांनी मात्र ही माहिती त्यांच्या संसदेत जाहीर केली, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे भारत-कॅनडातील वाद कमी करण्यासाठी अमेरिकेकडूनच मध्यस्थी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमेरिकेनं दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी 'मागच्या दाराने' चर्चा सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
कॅनडा आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तणावात अमेरिका आपला स्वार्थ साधतेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनं कॅनडाला गुप्त माहिती दिली होती, परंतु कॅनडानं याचा अर्थ वेगळाच काढला आणि थेट संसदेतच सर्व माहिती जाहीर केली. NYT च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील एका उच्चपदस्त अधिकाऱ्यानं फाईव्ह आईजनं कॅनडाला गुप्त माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे कथितरित्या कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताविरुद्ध भूमिका घेण्यास भाग पाडल्याचं सांगितलं जात आहे.
भारतानं ट्रुडो यांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतून प्रेरित असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. तसेच, इकडचं तिकडचं बोलू नका आधी पुरावे द्या, असं म्हणत भारतानं कॅनडाला थेट फटकारलं आहे. यासोबतच कॅनडानं भारतीय राजदुताची हकालपट्टीही केली होती, त्या बदल्यात भारतानंही कॅनडाच्या सर्वोच्च राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. कॅनडा हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आरोपही भारतानं केला आहे.
भारत आणि कॅनडातील वादाचं नेमकं कारण काय?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, भारत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत." तसेच, पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो." दरम्यान, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच प्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले असून भारतानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.