US Attacks Iran: खेळ अजून संपलेला नाही! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे पुढचे पाऊल काय असणार? मध्यपूर्वेत हालचालींना वेग
US Attacks Iran: रशिया, चीन आणि पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन सत्रासमोर मध्य पूर्वेतील युद्धबंदीचा मसुदा प्रस्ताव सादर केला आहे.

US Attacks Iran: इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. या हल्ल्यामुळे जग दोन गटात विभागले गेले आहे, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाच्या उबंरठ्यावरजग येऊन थांबले आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प म्हणाले, अमेरिकेचे उद्दिष्ट इराणची अणुसंवर्धन क्षमता नष्ट करणे आहे. अमेरिका इराणचा अणुधोका कायमचा संपवू इच्छित होती. रशिया आणि चीनसह अनेक मुस्लिम देशांनी अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे पुढचे पाऊल काय?
इराणने म्हटले आहे की ते या हल्ल्याचा अमेरिकेकडून बदला घेतील. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, "इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि अणुप्रसार अप्रसार कराराचे (एनपीटी) उल्लंघन केले आहे. आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, असंही त्यांनी पुढे सांगितले. इराणी न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सांगितले की, अमेरिकन लोकांना त्यांच्या हल्ल्याचे उत्तर मिळाले पाहिजे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली शामखानी यांनी एक्स वर पोस्ट केले, "अणुस्थळे नष्ट झाली तरी खेळ संपलेला नाही."
युद्धबंदीबाबत एक प्रस्ताव सादर
रशिया, चीन आणि पाकिस्तानने मध्य पूर्वेत युद्धबंदीचा मसुदा प्रस्ताव सादर केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन सत्रासमोर या तिन्ही देशांनी मध्य पूर्वेत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीचा मसुदा प्रस्ताव सादर केला आहे. तो कधी मतदानासाठी ठेवला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठराव मंजूर होण्यासाठी किमान नऊ मतांची आवश्यकता आहे. यासोबतच, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया किंवा चीनकडून कोणताही व्हेटो नसावा.
स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यास मान्यता
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, इराणच्या संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यास मान्यता दिली. मात्र, हा निर्णय अद्याप अंतिम नाही. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि वायू व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अवलंबून आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चीनला इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद न करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. जर असे झाले तर ते आर्थिक आत्महत्या ठरेल असे अमेरिकेने म्हटले आहे. भारताने इंधन पुरवठ्यासाठी आवश्यक पावले उचलतील असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला आणि इराण आणि इस्रायलमधील संघर्षाबद्दल भारताची तीव्र चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले की, "आम्ही तणाव त्वरित कमी करण्याचे आमचे आवाहन पुन्हा सांगितले आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करणे केवळ संवाद आणि राजनयिकतेद्वारेच शक्य आहे."
अमेरिकेचा हल्ला बेजबाबदार - रशिया
अमेरिकेच्या इराणवरील आण्विक तळांवर हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध केला आणि तो बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. रशियाने म्हटले की, हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे सनद आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे घोर उल्लंघन आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "एका सार्वभौम देशावर क्षेपणास्त्रे आणि बॉम्बने हल्ला करण्याचा निर्णय बेजबाबदार आहे, त्यासाठी कोणतेही कारण दिले जात असले तरी."
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन - चीन
चीनने संपूर्ण घटनेचा निषेध केला आणि म्हटले की अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उद्दिष्टांचे आणि तत्त्वांचे गंभीर उल्लंघन आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "यामुळे मध्य पूर्व क्षेत्रात तणाव वाढला आहे." चीनने इस्रायलला तात्काळ युद्धबंदी जाहीर करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाटाघाटी सुरू कराव्यात असे आवाहन केले. चीन न्यायाचे रक्षण करण्यासाठी आणि मध्य पूर्व प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत एकजुटीने उभे राहील, असंही म्हटलं आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांची प्रतिक्रिया
इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेच्या हल्ल्याबद्दल सौदी अरेबियाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर पोस्ट केली आणि लिहिले की, आम्ही मध्य पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, "या प्रदेशातील सध्याच्या धोकादायक तणावाचे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विनाशकारी परिणाम होऊ शकतात." ओमानने इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे थेट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ओमानने सर्व पक्षांना परिस्थिती शांत करण्याचे आवाहन केले आहे.
ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानने काय म्हटले?
पाकिस्तानने अमेरिकेच्या इराणच्या आण्विक तळांवर हल्ल्यांचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले. पाकिस्तानने या प्रदेशात हिंसाचार आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. याच्या एक दिवस आधी, पाकिस्तानने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा दिला होता. पाकिस्तानने म्हटले आहे की, हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार इराणला स्वतःचा बचाव करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
अमेरिका डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांना विचारले प्रश्न
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे की, इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्याच्या निर्णयाबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला स्पष्ट उत्तर द्यावे. सिनेटर चक शुमर यांनी यावर भर दिला, कोणत्याही राष्ट्रपतीला देशाला युद्धासारख्या परिणामकारक गोष्टीत एकतर्फी ढकलण्याची परवानगी देऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिका-इस्रायलच्या समर्थनार्थ ब्रिटन आला पुढे
अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर जग दोन भागात विभागले गेले आहे असे दिसते आहे. एकीकडे रशिया-चीनसह अनेक मुस्लिम देशांनी अमेरिकन हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हटले. दुसरीकडे, इस्रायलने अमेरिकेचे आभार मानले. यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आणि इराणला कधीही अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असंही पुढे सांगितलं आहे.























