पहिल्या टप्प्यातील सर्व कोरोना लस अपूर्ण आणि अप्रभावी असण्याची शक्यता : युके वॅक्सिन टास्कफोर्स
संशोधन सुरु असलेल्या बहुतेक किंवा सर्व लसी या अपयशी ठरतील आणि काही व्यक्तींवर त्या अप्रभावी ठरतील असे या अभ्यासात म्हटले आहे.जगाची लोकसंख्या लक्षात घेता लसींची संख्या अपुरी पडेल असेही त्यांनी सांगितलंय.
लंडन: जगभर कोरोनावर संशोधित होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील सर्व लसी या 'अपूर्ण' असतील आणि त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रभावी ठरणार नाहीत, असे मत युके वॅक्सिन टास्कफोर्सच्या अध्यक्षा केट बिंघम यांनी व्यक्त केलंय. यासंबधी मेडिकल क्षेत्रातील प्रतिष्ठित असलेल्या 'द लॅन्सेट' या नियतकालीकेत एक लेख लिहून त्यांनी हे मत मांडलंय.
त्यांनी या लेखात पुढे असे लिहले आहे की, "पहिल्या टप्प्यातील बहुतेक वा सर्वच लसी या अपूर्ण असतील. त्या कोरोनापासून आपला बचाव करतील की नाही, ते सांगता येणार नाही. परंतु कोरोनाची लक्षणे काही प्रमाणात कमी करण्याचे काम त्या निश्चितपणे करतील. या लसी प्रत्येक व्यक्तीवर प्रभावीपणे काम करतीलच असेही नाही. तसेच त्यांचा प्रभाव दीर्घकाळासाठी टिकेल याचीही शाश्वती नाही."
केट बिंघम यांनी असं म्हटले आहे की, "युके वॅक्सिन टास्क फोर्सला असे लक्षात आलंय की, कोरोनावर सध्या सुरु असलेली अनेक संशोधने, कदाचित सर्वच संशोधने ही अपयशी ठरतील. त्यापैकी काही लसी या यशस्वी झाल्याच तर त्या 65 वर्षावरील व्यक्तीवर प्रभावी ठरतील का ही देखील शंका आहे. तसेच जगाची अब्जावधीची लोकसंख्या लक्षात घेता उत्पादित करण्यात येणाऱ्या लसींचे प्रमाण हे तुलनेत खूपच कमी आहे. प्रत्येक व्यक्तीला ही लस उपलब्ध होणार नाही."
याआधी मंगळवारी लंडनच्या इंपेरियल कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की उन्हाळ्याच्या काळात ब्रिटीश लोकांच्या शरीरातील कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावरुन हे सूचित होते की कोरोना संक्रमणानंतर करण्यात आलेले सुरक्षेचे उपाय हे जास्त काळापर्यंत टिकत नाहीत. त्यामुळे समुदायातील रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याची शक्यता जास्त आहे.
टेलिग्राफ वृत्तपत्राच्या एका बातमीनुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अत्यंत भयानक असेल या गृहीतकावर ब्रिटीश सरकार काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या: