Turkey Syria Earthquake : भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सध्या अंतिम टप्प्यात
Turkey Syria Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाच्या सहा दिवसांनंतरही बचावकार्य सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Turkey Syria Earthquake Updates : तुर्की (Turkiye) आणि सीरियामध्ये (Syria) भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा 34,000 च्या पुढे पोहोचला असून 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी रोजी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. यानंतरही भूकंपाचे अनेक धक्के बसले. यामुळे तुर्कीतील दहा शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. सीरियामध्येही हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत तुर्की प्रशासन आणि भारतीय जवानांकडून भूंकपग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे.
प्रशासनासमोर मोठं आव्हान (Turkey Syria Earthquake Updates)
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाच्या सहा दिवसांनंतरही बचावकार्य सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा हटवला जात असताना अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेष म्हणजे भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरुप बाहेरही काढण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासोबतच बचावलेल्या नागरिकांना अन्न आणि थंडीपासून संरक्षण देणे, हे सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.
Earthquake death toll across Turkey-Syria crosses 34,000
— ANI Digital (@ani_digital) February 12, 2023
Read @ANI Story | https://t.co/mxRWMCtiFN#TurkeySyriaEarthquake #TurkeyEarthquake #syriaearthquake pic.twitter.com/1zyVnnbNDa
भूकंपामध्ये 50 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 50,000 असू शकते अशी भीती, संयुक्त राष्ट्रांनी (UN) व्यक्त केली आहे. भूकंपामुळे मृतांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला. भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सध्या समोर आलेल्या संख्येपेक्षा दुप्पट असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भूकंपामुळे हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्यांच्या ढिगाऱ्यातून लोकांचा शोध सुरु आहे.
बचावकार्य अंतिम टप्प्यात
संयुक्त राष्ट्रांच्या मदत युनिटचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स म्हणाले की, 'भूकंपामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झालं आहे. भूकंपबाधित भागातून ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. सध्या बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे, पण ते काम कधीपर्यंत सुरु राहिल, हे अद्याप सांगता येणार नाही.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :