एक्स्प्लोर
... अन्यथा आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, अमेरिकेचा पाकला इशारा
पाकिस्तानने आपली वर्तणूक बदलणार नसेल, आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देणं बंद करणार नसेल, तर त्याविरोधात बळाचा वापर करावा लागेल, असा स्पष्ट शब्दात इशारा ट्रम्प प्रशासनातील मंत्री जिम मॅटिस यांनी दिला आहे.

वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनातील मंत्री जिम मॅटिस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानसोबत पुन्हा संबंध सुधारण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पण पाकिस्तानने आपली वर्तणूक बदलणार नसेल, आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देणं बंद करणार नसेल, तर त्याविरोधात बळाचा वापर करावा लागेल, असा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. मॅटिस म्हणाले की, "जर ते (पाकिस्तान) आपल्या देशात दहशतवाद्यांना आश्रय देण्याविरोधात कारवाई करणार नसतील, तर त्यांना राजकीय दृष्ट्या वाळीत टाकलं जाईल. तसेच त्याच्याकडून गैर नाटो देशांच्य सहयोगी देशाचा दर्जाही काढून घेतला जाईल." दक्षिण आशिया आणि आफगाणिस्तानवर काँग्रेससमोर चर्चेदरम्यान मॅटिस यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलं. मॅटिस यांनी सदनाच्या सशस्त्र सेवा समितीला सांगितलं की, "जर आमचे सर्वोत्तम प्रयत्न देखील कमी पडले, तर ट्रम्प कोणतीही पावलं उचलण्यास समर्थ आहे." पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधाक कोणतीही कारवाई करत नसल्याने, काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन काँग्रेस सदस्यांनी मॅटिस यांना काही प्रश्नही विचारले. त्याला उत्तर देताना मॅटिस यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. मॅटिस पुढे म्हणाले की, "जर पाकिस्तान स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विकासाला प्राधान्य देणार नसेल, तर अमेरिकेला बळाचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दहशतवादाला आश्रय देणं पाकिस्तानला सर्वात महाग पडू शकतं. आंतरराष्ट्रीय समुहासोबत हातात हात मिळवून वाटचाल करणं पाकिस्तानसाठी फायद्याचं आहे. पण जर ते दुसऱ्या मार्गाने जाणार असतील, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल." दरम्यान, अमेरिका पुन्हा पाकिस्तानला सुधारण्याची आणखी एक संधी देत असल्याचं सांगून मॅटिस यांनी यावेळी सांगितलं. यावर काँग्रेस सदस्य रिक लार्सन यांनी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना, त्यांचा गैर नाटोचा दर्जाही काढून घेतला जाऊ शकतो का? असा सवाल विचारला. त्यावरही मॅटिस यांनी होकारार्थी उत्तर दिलं. सध्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ द्विपक्षीय संबंध सुधारावेत, यासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर मॅटिस यांनी पाकिस्तानाला खडेबोल सुनावले आहेत. त्यावर पाकिस्तान काय भूमिका घेतं हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये आफगाणिस्तान आणि दक्षिण आशियासंदर्भात अमेरिकेच्या रणनितीची घोषणा केली होती. यात त्यांनी पाकिस्तानविरोधात कठोर शब्द वापरले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























