Pakistan Tehreek-e-Insaf : पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय उद्रेक; जे बांगलादेशमध्ये घडलं तेच आता पाकिस्तानमध्ये सुद्धा होणार?
Pakistan Tehreek-e-Insaf : इस्लामाबाद प्रशासनाकडून संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी शिपिंग कंटेनर आणि दंगलविरोधी पोलिस तैनात करून शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग रोखले आहेत.
Pakistan Tehreek-e-Insaf Protest : पाकिस्तानमध्ये (Pakistan Tehreek-e-Insaf Protest) पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी लोकांनी एल्गार केला आहे. इम्रान खान विविध गुन्ह्याखाली गेल्या एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहेत. खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रविवारी इस्लामाबादमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या वादग्रस्त निवडणुकीनंतर पीटीआयकडून पहिलंच राजकीय शक्तीप्रदर्शन आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या फोटोंवरून आणि व्हिडिओमध्ये इम्रान खान समर्थक देशाच्या विविध भागातून राजधानीकडे कूच करताना दिसत आहेत.
इम्रान खान यांची सूटका होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही
“इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होईपर्यंत आम्ही आराम करणार नाही,” असे सांगत इम्रान खान यांचे निकटवर्तीय हम्माद अझहर यांनी इरादा स्पष्ट केला आहे. खान एकमेव व्यक्ती आहेत जे या देशाला “भ्रष्ट आणि अक्षम राजकारण्यांच्या तावडीतून” वाचवू शकतात, अशी प्रतिक्रिया लाहोरमधील प्रख्यात वकील आणि पीटीआय नेते सलमान अक्रम राजा यांनी दिली आहे.
इस्लामाबाद प्रशासनाकडून संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी शिपिंग कंटेनर आणि दंगलविरोधी पोलिस तैनात करून शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग रोखले आहेत. शेकडो पीटीआय कार्यकर्ते रस्ते मोकळे करण्यासाठी कंटेनर दूर ढकलताना दिसत आहेत. रॅलीतील उपस्थिती दडपण्यासाठी अधिकारी कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. समा न्यूजवर प्रसारित केलेल्या व्हिज्युअलमध्ये संतप्त उपस्थित दंगल पोलिसांवर दगडफेक करताना दिसून आले, त्यांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फेकल्या.
पाकिस्तानी न्यायालयाने इस्लामाबादच्या सीमेवर रॅली काढण्याची परवानगी दिली
अल जझीराने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच पीटीआयला पाकिस्तानी न्यायालयाने इस्लामाबादच्या सीमेवर रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी कंटेनर लावून मार्ग अडवले आहेत. ज्यामुळे लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. इस्लामाबाद पोलिसांच्या प्रवक्त्याने एका निवेदनात आंदोलकांवर पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला, त्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाले.
इम्रान खान यांनाएप्रिल 2022 मध्ये अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात आले होते. ते ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. गेल्यावर्षी 9 मे रोजी हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जात आहे. लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खान यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. युनायटेड नेशन्सच्या अधिकार तज्ञांच्या पॅनेलने खान यांच्या अटकेला “कोणताही कायदेशीर आधार नव्हता आणि त्याला राजकीय पदासाठी अपात्र ठरवण्याचा हेतू होता” असे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या