Share Market around the World : जगभरातील शेअर मार्केटमध्ये अक्षरश: हाहाकार; अमेरिकन शेअर मार्केटमध्येही तज्ज्ञांकडून 'ब्लॅक मंडे'ची भविष्यवाणी!
भारतासह जगभरातील शेअर मार्केटमध्ये (Share Market around the World) जशास तशा शुल्कामुळे हाहाकार उडाला असून आज भारतीय शेअर बाजारातत ब्लडबाथ झाला आहे.

Share Market around the World : अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या जशास तशा शुल्कामुळे जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारतासह जगभरातील शेअर मार्केटमध्ये (Share Market around the World) या निर्णयाने हाहाकार उडाला असून आज भारतीय शेअर बाजारातत ब्लडबाथ झाला आहे. शेअर बाजारात आज, म्हणजेच सोमवार 7 एप्रिल रोजी अभूतपूर्व घसरण झाली आहे. सेन्सेक्स 3000 अंकांनी (4 टक्के) खाली आहे आणि सुमारे 72,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 900 अंकांनी (4.50 टक्के) खाली आहे. तो 22,000 च्या खाली व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील सर्व 30 समभाग घसरत आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस सुमारे 10 टक्के खाली आहेत. टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एल अँड टी देखील 8 टक्क्यांनी घसरले. NSE क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल सर्वात जास्त 8 टक्के घसरला आहे. आयटी, तेल आणि वायू आणि आरोग्य सेवा निर्देशांकात सुमारे 7 टक्क्यांची घसरण आहे. ऑटो, रियल्टी आणि मीडिया निर्देशांक 5 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आहेत.
भारतीय शेअर बाजारावर परिणाम
बाजारातील अस्थिरता
शुल्क वाढीमुळे व्यापार युद्धांची भीती निर्माण झाली असून यामुळे निर्यात-केंद्रित शेअर्सना फटका बसला आहे. अमेरिकेतील मागणी कमी झाल्यामुळे आयटी, ऑटो, फार्मा आणि कापड यासारख्या क्षेत्रांना दबावाचा सामना करावा लागू शकतो.
रुपयाचे अवमूल्यन
व्यापार तणावामुळे रुपया अजून कमकुवत होण्याचा परिणाम असून ज्यामुळे परदेशी कर्ज किंवा आयात अवलंबित्व असलेल्या कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जगभरातील शेअर मार्केटमध्ये अक्षरश: हाहाकार
हाँगकाँगचा हँग सेंग 10 टक्के घसरला, चीनी निर्देशांक देखील 6.50 टक्के खाली
आशियाई बाजारात, जपानचा निक्की 6 टक्के कोरियाचा कोस्पी निर्देशांक 4.50 टक्के, चीनचा शांघाय निर्देशांक 6.50 टक्के खाली आहे. हाँगकाँगचा हँग सेंग 10 टक्के खाली आहे. NSE इंटरनॅशनल एक्सचेंजवर व्यवहार केलेला गिफ्ट निफ्टी सुमारे 800 अंकांनी (3.60 टक्के ) घसरून 22180 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. 3 एप्रिल रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स 3.98 टक्के घसरला. S&P 500 निर्देशांक 4.84 टक्क्यांनी घसरला. Nasdaq Composite 5.97 टक्क्यांनी घसरला. आर्थिक विश्लेषक जिम क्रेमर यांनी 1987 प्रमाणे 'ब्लॅक मंडे'ची भविष्यवाणी केली आहे. क्रेमर म्हणाले की, आज अमेरिकन बाजार 22 टक्के घसरू शकतो.
बाजार घसरण्याची तीन कारणे
ट्रम्प यांच्याकडून परस्पर शुल्काची घोषणा
अमेरिकेने भारतावर 26 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारताव्यतिरिक्त चीनवर 34 टक्के, युरोपियन युनियनवर 20 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, जपानवर 24 टक्के, व्हिएतनामवर 46 टक्के आणि तैवानवर 32 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.
चीननेही अमेरिकेवर 34 टक्के शुल्क लादले
चीनने शुक्रवारी अमेरिकेवर 34 टक्के जशास तसे शुल्क लादण्याची घोषणा केली. नवीन दर 10 एप्रिलपासून लागू होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगभरात टायट-फॉर-टॅट टॅरिफ लागू केले होते. यामध्ये चीनवर 34 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्यात आले. आता चीनने अमेरिकेवर तोच दर लावला आहे.
आर्थिक मंदीची चिंता
टॅरिफमुळे वस्तू महाग झाल्यास, लोक कमी खरेदी करतील, ज्यामुळे अर्थव्यवस्था मंद होऊ शकते. तसेच मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दरही घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
4 एप्रिल रोजी बाजार 930 अंकांनी घसरल्यानंतर बंद झाला
4 एप्रिल रोजी सेन्सेक्स 930 अंकांनी (1.22 टक्के) घसरून 75,364 वर बंद झाला. निफ्टीमध्ये 345 अंकांची (1.49 टक्के) घसरण झाली, तो 22,904 च्या पातळीवर बंद झाला. NSE क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी मेटल इंडेक्स सुमारे 6.56 टक्के घसरला. फार्मा, रियल्टी आणि आयटी निर्देशांक सुमारे 4 टक्के घसरले. ऑटो, मीडिया इंडेक्स सुमारे 3 टक्के घसरले.
इतर महत्वाच्या बातम्या























