(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाची दहशत; अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये महिला शिंकली, मालकाने 26 लाखांचा माल फेकला
कोरोना व्हायरसची जगभर दहशत आहे. प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीने आपापल्या परिने स्वत:ची काळजी घेत आहे. याच काळजीपोटी अमेरिकेतील एका सुपरमार्केट मालकाने एक महिला शिंकली म्हणून 26 लाखांचा माल फेकून दिला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रोज हजारोंनी वाढ होत आहे. त्यामुळे जगभरात दहशतीचं वातावरण आहे. अमेरिकेतील एक महिला सुपरमार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेली होती. लोकांची मस्करी करावी या उद्देशाने ती सुपरमार्केटमध्ये सहज शिंकली. मात्र भीतीपोटी सुपरमार्केटच्या मालकाने तेथे असलेला 26 लाखांचा माल फेकून दिली. यावरुन कोरोना व्हायरसच्या दहशतीचा तुम्हाला अंदाज लावता येऊ शकतो.
या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेच्या गेरिटीज सुपरमार्केटचा मालक जोय फासुला याने हा संपूर्ण प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. फासुलाने सांगितलं की, बुधवारी दुपारी एक महिला सुपरमार्केटमध्ये आली होती. फळ-भाज्या असलेल्या ठिकाणी ती शिंकली. प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
महिला प्रँक करत होती असं सांगितलं जात आहे. तिला कोरोनाची लागण देखील झालेली नाही. मात्र मालकाने खबरदारी म्हणून स्वत: दुकानातील सर्व सामान फेकून दिलं. जवळपास 26 लाखांचं हे सामान होतं. मालकाने ही महिला सुपरमार्केटमध्ये ज्या-ज्या ठिकाणी फिरली ती सगळी जागा निर्जंतुक केली आहे.
अमेरिकत कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकट्या अमेरिकेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या घरात गेली आहे, तर 1300 हून अधिक नागरिकांचा येथे मृत्यू झाला आहे.
भारतातही कोरोना बाधितांचा झपाट्याने वाढणारा आकडा चिंतेचा विषय बनला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 935 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 84 जण बरेही झाले आहेत.
कोरोना संबंधित बातम्या
- आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला; पुण्यातील मराठमोळ्या महिलेची किमया
- Coronavirus | मेड इन इंडिया : पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स
- घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा : नितीन गडकरी
- Coronavirrus | राज्यातील आठ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्राची मान्यता, अमित देशमुखांची माहिती