(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अफगाणिस्तान आत्मघाती हल्ल्यानं हादरलं; 20 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर आत्मघाती हल्ल्यानं हादरलं आहे. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला तर 20हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 हिंदू व शीख नागरिकांचा समावेश आहे.
काबूल : अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर आत्मघाती हल्ल्यानं हादरलं. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला तर 20हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 हिंदू व शीख नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी जलालाबादच्या दौऱ्यावर होते. अधिकाऱ्यांनी या आत्मघाती बॉम्ब स्फोटाची अधिकृत माहिती दिली. हल्ल्याची जबाबदारी अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
जलालाबाद शहरातील एका बाजारपेठेत हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या परिसरात अनेक हिंदू आणि शीख नागरिकांची दुकानं आहे. हल्ला होण्याच्या काही तासांपूर्वीच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी या भागातील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं होतं.
अशरफ घनी यांची राज्यपाल बंगल्यामध्ये बैठक सुरु असताना आत्मघाती हल्ला झाल्याची माहिती सरकारी प्रवक्ता अताऊल्लाह खोगयानी यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्षांचा दौरा असल्यामुळे परिसरात मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. बाजारपेठेतील आणि आजुबाजुच्या परिसरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली होती. राष्ट्राध्यक्षांचा दौरा नसता तर मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अफगाणिस्तान हल्ल्याचा निषेध केला आहे. 'अफगाणिस्तानच्या बहुसांस्कृतीक संरचनेवरील हा हल्ला आहे. हल्ल्यात जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो. अफगाणिस्तानच्या दु:खद काळात भारत त्यांच्या सोबत आहे', असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
We strongly condemn the terror attacks in Afghanistan yesterday. They are an attack on Afghanistan's multicultural fabric. My thoughts are with the bereaved families. I pray that the injured recover soon. India stands ready to assist the Afghanistan government in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2018