Asiana Airlines: आता मात्र हद्दच झाली! विमानात आपत्कालीन दरवाज्यामुळेच निर्माण झालं संकट, नेमकं काय घडलं?
Plane Door Opens Mid Flight:दक्षिण कोरिआमध्ये एशियन एअरलाईन्सच्या विमानाचा आपतकालीन दरवाजा एका प्रवाश्याकडून चुकून उघडला गेला. त्यानंतर नऊ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Asiana Airlines : मागील काही दिवसांपासून विमानात (Flight) बऱ्याच विचित्र घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कधी विमानात विंचू सापडतो तर कधी विमानात लघुशंका करण्याची घटना घडते. अशा अनेक घटना विमानात गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत. या विचित्र घटनांमुळे नागरिकांना विमान प्रवासाची धास्ती वाटू लागली आहे. परंतु आता मात्र विमानात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विमानातील आपत्कालीन दरवाजा एका प्रवाशाकडून चुकून उघडला गेला. बरं विमान जमिनीवर असताना काही संकट आलं असतं आणि त्या प्रवाशाने दरवाजा उघडला असता तर त्याचं सर्वांनी कौतुक केलं असतं. परंतु या प्रवाशाने विमान हवेत असताना चुकून दरवाचा उघडला. त्यामुळे त्याने उघडलेल्या या आपत्कालीन दरवाज्याने विमानातील इतर प्रवाशांसाठी संकटच निर्माण केलं.
नेमकं काय घडलं?
दक्षिण कोरिआतील (South Korea) एशियन एअरलाइन्सचे विमान डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (26 मे) रोजी काही वेळातच उतरणार होते. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. विमान हवेत असतानाच एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. या विमानात एकून 194 प्रवासी होते. विमान हवेत असताना हा दरवाजा उघडल्याने अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परंतु या सर्व प्रवाशांा सुखरुप विमानातून बाहेर काढण्यात आले. काही लोकांना श्वसनाचा त्रास झाला त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विमानात अनेक विद्यार्थी देखील प्रवास करत होते. या सर्व प्रकारामुळे हे विद्यार्थी संपूर्ण घाबरुन गेल्याचं या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलं.
Asiana Airlines A321 lands safely at Daegu Airport in South Korea after the emergency exit door was opened by a passenger on approach. 9 people taken to hospital with breathing difficulties. pic.twitter.com/Jzed4PMDvc
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) May 26, 2023
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर देखील बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला. विमानातील अनेक प्रवासी या प्रवाशाला दरवाजा उघडण्यापासून थांबवत होते असं देखील सांगितलं जात आहे. परंतु त्याने हा दरवाजा का उघडला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु या प्रवाशाला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता या व्यक्तीवर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.