Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण, युक्रेनचे 9 तर रशियाचे 15 हजार सैनिकांचा मृत्यू, आतापर्यंत काय काय घडलं?
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे. अशात हे युद्ध संपणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. युक्रेन (Ukraine) आपला 31 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना जग मात्र आर्थिक पारतंत्र्यात जात असल्याचं दिसत आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे. अशात हे युद्ध संपणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा महिन्यापूर्वी रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि या हल्ल्यात युक्रेन तीन ते चार दिवसात गुडघे टेकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पुतीन यांनी तिन्ही बाजूने युक्रेनला घेरत राजधानी किव्हपर्यंत मजल मारत अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र, युक्रेन मागील सहा महिन्यापासून पाश्चिमात्य देशांनी पुरवलेली आर्थिक गंगाजळी आणि युद्ध सामाग्रीवर रशियाशी लढा देत आहे.
24 फेब्रुवारी 2022 रोजी पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि आपलं सैन्य युक्रेनच्या दिशेने धाडलं. संपूर्ण जगासाठीच हा आश्चर्याचा धक्का होता. रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या आक्रमणानंतर जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध टाकायला सुरुवात केली. ज्यामुळे रशियाची आर्थिक कोंडी झाली.
युद्धाचे दिवस पुढे सरकत असताना दोन्ही बाजूच्या लष्कराला मोठे धक्के बसले. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाला सर्वाधिक लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे शेकडो युक्रेनियन नागरिकांचा यात मृत्यू झाला. सोबतच अनेक जण मृत्यूच्या भीतीखाली जगत आहेत. रशियाने काल (24 ऑगस्ट) क्षेपणास्त्राने केलेल्या हल्ल्यात 22 जण मृत्यूमुखी पडली आहेत. अनेक अर्थाने युक्रेन देखील बेचिराख झाला आहे.
रशियाला किव्ह राजधानी आपल्या ताब्यात न घेता आल्याने त्याने आपले हल्ले पूर्व युक्रेन भागात सिमीत केले आहेत. अशात खारकिव्ह आणि डोनबास भाग आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खारकिव्हवर पुन्हा युक्रेनियन सैन्याने ताबा घेतला. दोन्ही बाजूने काऊंटर अटॅक सुरु आहेत. अशात झॅपोरिझ्झिया अणुप्रकल्पावर देखील रशियाचा ताबा आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचे सहा महिने!
- युक्रेनचे 9 हजारांहून अधिक सैनिक युद्धात मारले गेले आहेत. रशियाचे 15 हजारांहून अधिक सैनिक युद्धात मारले गेले
- 6 हजारांहून अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून आठ हजार नागरिक युद्धामुळे आतापर्यंत जखमी झाले आहेत
- मरिओपोल शहर संपूर्णपणे रशियाने उद्ध्वस्त केलं आहे. ज्यात दहा हजारांहून अधिक सामान्यांचा मृत्यू अन्न, पाणी आणि औषध गोळ्या न मिळाल्याने झाला
- युद्ध सुरु झाल्यापासून 1 कोटींहून अधिक नागरिकांनी युक्रेन सोडला. तर पूर्व युक्रेनमधील नागरिकांनी पश्चिम यूक्रेनमध्ये आश्रय घेतलाय
- युक्रेनची युद्धाआधी 7 टक्के जमीन रशियाच्या ताब्यात होती. ती 22 टक्के जमीन आता त्यांच्या ताब्यात गेली आहे.
- युक्रेनची अर्थव्यवस्था युद्धानंतर अर्ध्यावर आली आहे, त्यामुळे युद्ध जरी थांबले तरी युक्रेनला उभं राहणं अवघड जाणार आहे
रशियाच्या अर्थव्यवस्थेला फटका, तर युक्रेनची अर्थव्यवस्था खिळखिळी
रशियाच्या अर्थव्यवस्थेला आतापर्यंत 24 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे तर युक्रेनची अर्थव्यवस्था 48 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीसोबतच खिळखिळी झाली आहे. अमेरिकेकडून युद्ध सुरुच राहावे यासाठी युक्रेनला आतापर्यंत 30 अब्ज डॉलरहूनअधिकची मदत देऊ केली आहे. त्यामुळे युद्ध संपणार तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
1991 च्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियावरील पाश्चिमात्य देशांनी घातलेले निर्बंध हे त्यांच्या देशाला सर्वात मोठा धक्का आहे. ऑलिगार्चवरील कारवायांमुळे देखील हात दगडाखाली आहेत. खत, गहू, धातू आणि ऊर्जेच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महागाईची भर पडत आहे. अशात हे युद्ध आणखी सहा महिने चालल्यास दोन्ही अर्थव्यवस्था कोसळून पडतील. ज्याचा फटका संपूर्ण जगाला बसेल.
सध्याची परिस्थिती बघितली तर युक्रेनला युद्ध सुरु ठेवण्यासाठी मोठी मदत होत आहे. अशात आपली राष्ट्रीयता टिकवण्यासाठी युक्रेन लढत आहे. रशिया आपली राष्ट्रीयता धोक्यात आल्याचं म्हणत युक्रेनने निशस्त्रीकरण करावे, नाटोत सहभागी होऊ नये आणि क्रिमिया रशियाचा भाग मानावा असं म्हणत आहे. मात्र, युक्रेन यासाठी तयार नाही. त्यामुळे यात पुढाकार घेत हे युद्ध कोण थांबवणार हे बघणं महत्त्वाचं असेल.