Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याला मित्र देशांसह प्रत्युत्तर देणार; बायडन यांचा इशारा
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले.
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला अमेरिका आणि मित्र देश एकजुटीने आणि निर्णायकपणे प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला आहे. अमेरिका नाटो आणि इतर देशांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने या आधीच युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अमेरिका रशियाविरोधात कोणती पावले उचलणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीने निवेदन जाहीर केले. रशियाने केलेला हल्ला हा विनाकारण आणि अन्यायकारक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले. अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बायडन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बायडन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्याची दूरध्वनीवरून चर्चा केली.
जी-7 ची बैठक होणार
रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मित्र देशांसोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला. ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या देशांसोबत गुरुवारी बैठक होणार आहे.
रशियाची कोंडी करणार?
जी-7 बैठकी रशियाची कोंडी करण्यासाठी अधिक निर्बंध लागू करण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका आणि इतर काही देशांनी रशियाने निर्बंध लावले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा परिणाम आंतररष्ट्रीय स्तरावरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु राहिल्यास कच्चं तेल आणखी महाग होऊ शकते.
या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारही गडगडला आहे. भारतातही शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: