Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे सैन्यदल आता युक्रेनमध्ये घुसले असून रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अहवालानुसार, रशियाच्या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 9 लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे सैन्यदल आता युक्रेनमध्ये घुसले असून रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, युक्रेनमधील मारियुपोल शहरात अनेक रणगाडे घुसले आहेत. विमानतळाजवळून धूर निघत असल्याचेही वृत्त आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये खळबळ
रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सोव्हिएत महासंघाचा भाग होता युक्रेन
युक्रेन हा देश 1990 पर्यंत सोव्हिएत महासंघाचा भाग होता. सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनच्या वाट्याला सोव्हिएत महासंघाच्या काळात विकसित करण्यात आलेले महत्त्वाचे बंदर, लष्करी विभाग आले. स्वतंत्र्यानंतर युक्रेनचे रशियासोबत चांगले संबंध होते. वर्ष 2014 पर्यंत व्हिक्टर यानुकोविच राष्ट्रपतीपदावरून हटण्याआधी रशियासोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यांच्या पश्चात आलेल्या सरकारने रशियाविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे युक्रेनमधील रशियन भाषिक प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे कारण काय? जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
- Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha