Russia Ukraine Crisis : युक्रेनवर हल्ला होणार? देशाबाहेर लष्करी कारवाई करण्यास रशियन संसदेची मंजुरी
Russia Ukraine Crisis : परदेशी भूमीवर रशियन सैन्याचा वापर करण्यास रशियन संसदेने राष्ट्रपती पुतीन यांना मंजुरी दिली आहे.
Russia Ukraine Crisis : रशियन संसदेने देशाबाहेर लष्कराचा वापर करण्याची परवानगी राष्ट्रपती पुतीन यांना दिली आहे. याबाबत पुतीन यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला पत्र लिहिले होते. रशियन संसदेच्या या परवानगीनंतर युक्रेनवरील हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
याआधी उप संरक्षण मंत्री निकोलाय पंकोव यांनी सांगितले की, राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी युक्रेनमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करण्यासाठी देशाबाहेर सैन्याचा वापर करण्यासाठी मंजुरी देण्याची विनंती केली होती. चर्चा आता थांबली असून युक्रेनने हिंसाचार आणि रक्तापाताचा मार्ग अवलंबला आहे. पुतीन यांच्या आवाहनानंतर बोलवण्यात आलेल्या फेडरेशन काउन्सिलच्या एका सत्रात पंकोव बोलत होते.
रशियाकडून युक्रेनमधील दोन प्रांताना स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या दोन प्रांतात रशियाचा पाठबळ असलेल्या फुटीरतावाद्यांचे वर्चस्व आहे.
रशियावर निर्बंध
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धजन्य स्थिती असताना आता अमेरिकेने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली आहे. यामुळे रशियाची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली.
युक्रेनला लष्करी मदत
अमेरिका युक्रेन आणि रशियामधील घडामोडींवर लक्ष ठेवून असून परिस्थितीचे आकलन करत आहे. अमेरिकेकडून युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय संरक्षणात्मक पावले उचलण्यात येत आहेत. अमेरिका युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणे सुरूच ठेवणार आहे. या मुद्यावर नाटोसोबत एकत्र मिळून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही बायडन यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: