फिलीपाइन्समध्ये Typhoon Rai चा कहर; 208 जण ठार, अनेक जखमी
Philippines Typhoon : फिलीपाइन्समध्ये धडकलेल्या राय चक्रिवादळामुळे 208 जणांचा मृत्यू झाला आहे.
Philippines Typhoon Update : फिलीपाइन्समध्ये राय चक्रीवादळामुळे हाहा:कार उडाला आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मृत्यू झालेल्यांची 208 झाली आहे. तर, अनेकजण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. नॅशनल पोलिसांनी 208 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. चक्रीवादळ रायमुळे फिलीपाइन्स बेट समूहाच्या दक्षिण आणि मध्य क्षेत्रामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या भागांमध्ये 239 जण जखमी झाले असून 52 जण बेपत्ता झाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये देशात आलेल्या घातक वादळांपैकी हे एक वादळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिलीपाइन्समधील वादळात 208 जणांचा मृत्यू
फिलीपाइन्समध्ये गुरुवारी चक्रीवादळ रायमुळे शेकडो लोक बेघर झाले आहे. चक्रीवादळ देशात धडकल्यानंतर जवळपास तीन लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. समुद्र किनाऱ्याजवळ राहणारे नागरीक, रिसॉर्टमधील पर्यटक, कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. फिलीपाइन्स रेड क्रॉसने किनारी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती दिली. घरे, रुग्णालये, शाळांसह इतर इमारतींचे ही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती रेडक्रॉस फिलीपाइन्सचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन यांनी दिली.
या चक्रीवादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. घरांचीही पडझड झाली आहे. अनेक झाडे वादळांमुळे तुटली आहेत. विजांचे खांबही तुटले आहेत. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बोहोल बेटावर मोठ्या नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. चॉकलेट हिल्स भागात 74 जण ठार झाले आहेत. 195 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे सिरगाओ, दीनागट आणि मिंडानाओ बेटावर मोठे नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळाची तुलना 2013 आलेल्या हैयान या चक्रीवादळाशी केली जात आहे. हैयान चक्रिवादळ सर्वात घातक चक्रीवादळ होते. सध्या राय चक्रीवादळामुळे फिलीपाइन्समधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.