एक्स्प्लोर
हार्टब्रेकने निराश, जवानांच्या गोळ्या झेलण्यासाठी तरुणाची सीमेवर चाल
प्रेयसीसोबत लग्न न करता आल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफने भारतीय सीमेच्या दिशेने चाल केली

नवी दिल्ली : प्रेयसीसोबत लग्न करता न आल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानी प्रियकराने थेट भारताची वाट धरली. भारताच्या सीमेवर बीएसएफ जवान गोळी झाडून आपला जीव घेतील, अशा त्याची अपेक्षा होती, मात्र ती खरी ठरली नाही. 32 वर्षीय मोहम्मद आसिफने भारतीय सीमेच्या दिशेने चाल केली, मात्र त्याला तुरुंगात डांबण्यात आलं आहे. बीएसएफच्या 118 बटालियनने आसिफला सोमवारी मॅबोके बॉर्डर पोस्टजवळ पकडलं आणि त्याला मामडोट पोलिसांच्या हवाली केलं. बीएसएफच्या जवानांनी झाडलेली गोळी आपल्या हृदयातून आरपार जाईल, आणि आपला त्रास संपेल, अशी धारणा असल्याचं आसिफने सांगितलं. आसिफ हा पाकिस्तानातील कसुर जिल्ह्यातील जल्लोके गावचा रहिवासी. आपला सर्वात मोठा भाऊ अतिक-उर-रहमानच्या मेहुणीच्या प्रेमात आसिफ पडला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते आणि त्यांना लग्न करायचं होतं. मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाची परवानगी नाकारली. आसिफच्या प्रेयसीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून देण्यात आलं. काही दिवसांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. त्यामुळे आसिफने पुन्हा तिच्या कुटुंबीयांकडे लग्नाची गळ घातली. दोन वेळा नकारघंटा ऐकावी लागल्यामुळे आसिफने आयुष्य संपवण्याचा निर्धार केला. गळफास घेऊन आयुष्य संपवावं, अशी योजना होती, मात्र रमझानच्या पवित्र महिन्यात आपल्याला तो हक्क नसल्यामुळे इरादा बदलल्याचं आसिफने पोलिसांना सांगितलं. आसिफवर इंडियन पासपोर्ट अॅक्ट आणि फॉरेनर्स अॅक्ट अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















