Pakistan : '...तर भारताची 8 लढाऊ विमानं पाडली असती'; पंतप्रधान शरीफ यांच्याकडून चर्चेचं आवाहन, पण पाकिस्तानी माजी हवाई दल प्रमुख मात्र बरळले
Ex-Pak Air Chief Marshal : एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ भारतासोबत चर्चेसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे माजी पाकिस्तानी हवाई दलाच्या माजी हवाई प्रमुखांनी हल्ल्याची भाषा वापरत आहेत.
India Pakistan Relation : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणाव जगजाहीर आहे. अशात एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM) शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) भारतासोबत मैत्रीचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख (Ex-Pak Air Chief Marshal) भारतासोबत युद्धाची भाषा करताना दिसत आहेत. 'आम्ही भारताची एक नव्हे तर आठ लढाऊ विमानं पाडली असती', असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी एअर चीफ मार्शल यांनी केलं आहे.
भारताला पंतप्रधान शरीफ यांचं चर्चेचं आवाहन
पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गरिबी आणि उपासमारी यामुळे पाकिस्तानी जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ भारताशी चर्चा करण्याचे आवहन करत आहेत. मात्र असे असताना पाकिस्तानचे लष्कर मात्र याच्या विरुद्ध भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुलाखतीमध्ये भारताला थेट चर्चेची ऑफर दिली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य दलाला मात्र हे पसंत नसल्याचं दिसत आहे.
काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अल अरेबिया चॅनेलचा दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानशी चर्चा करावी, भारत आणि पाकिस्तानचे प्रश्न चर्चेने सोडवू." शरीफ यांनी पुढे सांगितले की, "भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहोत. शांततेत जगणे हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रगती करा किंवा एकमेकांशी लढून वेळ आणि साधनसंपत्ती वाया घालवावी हे आपल्यावर आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात तीन युद्धे झाली आहेत आणि या युद्धामुळे आपल्या देशात गरिबी आणि बेरोजगारीत वाढ झाली आहे. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत आणि आम्हाला शांततेने जगण्याची इच्छा आहे."
काय म्हणाले पाकिस्तानचे माजी एअर चीफ मार्शल?
पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख (Ex-Pak Air Chief Marshal) सोहेल अमन (Sohail Aman) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बालाकोट स्ट्राईकबाबत मोठं वक्तव्य केलं. माजी एअर चीफ मार्शल सोहेल अमन म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी आमच्या निशाण्यावर आठ भारतीय लढाऊ विमाने होती. पण आम्ही त्यांचं फक्त एकच लढाऊ विमानं पाडलं कारण, आम्हाला दोन्ही देशांमधील तणावपूर्व परिस्थिती अजून वाढवायची नव्हती.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
पाकिस्तानला झटका! कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित